

ॲड. शिवाजी कांबळे
सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर गुरुवारी मध्यरात्री पडलेल्या दरोड्यात चोरट्यांनी सुमारे 10 किलो सोने आणि 25 किलो चांदी लंपास केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, बँकेच्या लॉकर्समधील मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेचा आणि भरपाईचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या दरोड्यात ग्राहकांना कोणतीही भरपाई मिळणार नसल्याने, आता बँकांनी विमा सुरक्षेसह लॉकर्स द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
रिझर्व्ह बँक आणि सहकार विभागाच्या नियमांनुसार, बँका ग्राहकांना लॉकर्स भाडेतत्त्वावर देतात. ग्राहक आणि बँक यांच्यातील करारात स्पष्ट नमूद असते की, लॉकर्समध्ये ठेवलेल्या वस्तूंची जबाबदारी बँकेची नसेल. तसेच, लॉकर्समधील वस्तूंवर कोणताही विमा नसतो. त्यामुळे दरोडा किंवा नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास ग्राहकांना भरपाई मिळण्याची कायदेशीर सोय सध्या उपलब्ध नाही.
कशी मिळू शकते मदत?
पोलिस तपासात दरोड्याचा छडा लागून मुद्देमाल जप्त झाला, तरच ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. जे ग्राहक आपल्या दागिन्यांची कागदोपत्री ओळख आणि खात्री पटवून देतील, त्यांनाच न्यायालयीन प्रक्रियेनंतर आपले दागिने परत मिळण्याची शक्यता आहे.
गोपनीयता की सुरक्षा?
सध्या लॉकर्समध्ये काय ठेवले आहे, याची माहिती बँकेलाही नसते. त्यामुळे विमा उतरवायचा झाल्यास वस्तूंबाबतची माहिती विमा कंपनीला द्यावी लागेल. यामुळे ग्राहकांच्या गोपनीयतेचा भंग होण्याची शक्यता असली, तरी भविष्यातील मोठे नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांनी आता गोपनीयतेपेक्षा सुरक्षिततेला अधिक महत्त्व देण्याची गरज आहे.