

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील बोलेगाव (वाबळे वस्ती) येथे झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) च्या पथकाने मोठे यश मिळवत दोन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरोड्यात सहभागी असलेल्या चार आरोपींपैकी दोन जणांना अटक करून त्यांना गंगापूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मंगळवारी (दि. 7 जानेवारी) मध्यरात्री वाबळे वस्तीवरील शेतकरी आबासाहेब दत्तात्रय वाबळे यांच्या शेतवस्तीवर सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. घराच्या मागील दरवाजातून घुसून चाकू, गुप्ती व कत्तीच्या धाकात दरोडेखोरांनी 1 लाख 62 हजार रुपयांचे सोन्याड्ढचांदीचे दागिने व रोख रक्कम लुटली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशत पसरली होती.ही कारवाई उपनिरीक्षक महेश घुगे, पोलिस हवालदार कासीम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, अनिल चव्हाण तसेच पोलिस अंमलदार बलबीरसिंग बहुरे, शिवाजी मगर व प्रमोद पाटील यांनी पार पाडली.
अंधारात दोघे फरार
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाबरगाव फाटा परिसरात सापळा रचला.पोलिसांना पाहताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तब्बल तीन ते चार किलोमीटर पाठलाग करून कुलथ्या भोसले व गोरख ऊर्फ ड्रायव्हर चव्हाण (दोघेही रा. बाबरगाव) यांना जेरबंद करण्यात यश मिळवले. उर्वरित दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.