

आटपाडी ः झरे (ता. आटपाडी) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर मध्यरात्री घडलेल्या दरोड्याने गावकुसात खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने फक्त सोन्या-चांदीचा ऐवज लंपास झाला नाही, तर ग्रामीण बँकिंग सुरक्षेतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. झरे येथे चोरट्यांनी रातोरात गॅस कटरने 22 लॉकर फोडले. सोने-चांदीच्या दागिन्यांसह मौल्यवान ऐवज लंपास केला. या घटनेनंतर जिल्हा बँकेच्या झरे शाखेतील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.
या दरोड्यानंतर समोर आलेली वस्तुस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे दिसून आले. जिल्हा बँकेच्या झरे शाखेत स्ट्राँग रूम व लॉकर रूमला सर्वसामान्य दर्जाचे दरवाजे आहेत, तर पाठीमागील बाजूस असलेल्या तकलादू खिडकीमार्गे थेट आतमध्ये प्रवेशाची संधी आहे. ग्रामीण भागात रात्रीची सक्षम गस्त नाही, तसेच या शाखेत सुरक्षारक्षकही नेमलेला नाही. दरोड्याला निमंत्रण देणारीच ही स्थिती ठरली. या शाखेत यापूर्वीही चोरीचा प्रयत्न झाला होता. हा अनुभव असतानाही येथे आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे.
बँकेच्या स्ट्राँग रूम व लॉकर रूम लोखंडी दरवाजांसह, सिमेंट-काँक्रिटच्या बांधकामासह अतिशय सुरक्षित असतात. मात्र भाडेतत्त्वावर असलेल्या झरे शाखेतील लॉकर रूमचे दरवाजे साधे आहेत. परिणामी चोरट्यांना गॅस कटरचा वापर करून बँकेमध्ये शिरकाव करणे तुलनेने सोपे झाले. नामांकित कंपनीचे लॉकर असूनही सुरक्षा व प्रवेश व्यवस्थेत त्रुटी असल्याने ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू प्रत्यक्षात सुरक्षित होत्या का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आटपाडी तालुक्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण सोळा शाखा आहेत. यापैकी फक्त आटपाडी शहर व आटपाडी मार्केट यार्ड या दोन शाखाच स्वतःच्या इमारतीत आणि सुरक्षारक्षकासह कार्यरत असून उर्वरित सर्व शाखा भाड्याच्या जागेत व सुरक्षेविनाच चालवल्या जात आहेत. झरे शाखेत शाखाधिकारी, क्लार्क व शिपाई, अशा तीन कर्मचाऱ्यांवर संपूर्ण कारभार सुरू आहे. एवढ्या कमी मनुष्यबळावर ग्राहकांच्या ठेवी व मौल्यवान दागिन्यांची जबाबदारी टाकणे धोक्याचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार लॉकरमधील मालावर कोणतेही थेट विमा संरक्षण नसते. काही नुकसान झाल्यास लॉकरधारकास लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या शंभरपट इतकीच नुकसान भरपाई मिळते. ही भरपाई नगण्य ठरत असल्याने याबाबत तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाच्या तपासात फारसे काही निष्पन्न झाले नाही. परंतु बँक परिसर तसेच आसपासच्या गावांतील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची तपासणी चालू आहे. गावात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांचीही प्राथमिक चौकशी करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक संजीव झाडे, पोलिस निरीक्षक विनय बहीर यांनी सांगितले. याबाबत बँकेचे शाखाधिकारी हणमंत गळवे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील कारवाई सुरू आहे. या दरोड्यानंतर ग्रामीण भागातील सहकारी बँकांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्राहकांनी आयुष्यभराची पूंजी व दागिने विश्वासाने बँकेत ठेवायचे, पण सुरक्षेचा आधार कमकुवत असेल, तर विश्वास शेवटी नक्की कोणावर ठेवायचा, असा सवाल तालुक्यातील सामान्य नागरिक, खातेदार आता विचारू लागला आहे.