

A minor girl actually swallowed a stolen gold Mangalsutra; shocking incident in Vita
विटा : पुढारी वृत्तसेवा एस टी बसस्थानकावर केलेल्या चोरीत मिळालेले सोन्याचे संपूर्ण मंगळसूत्र एका अल्पवयीन मुलीने अक्षरशः गिळून टाकल्याची धक्कादायक घटना विट्यात घडली आहे.
याबाबत समोर आलेली माहिती अशी की, काल शनिवारी बसस्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या एका संशयित अल्पवयीन मुलीला सतर्क प्रवाशांनी पोलिसांच्या मदतीने पकडले. या अनपेक्षित प्रकारामुळे पोलिसांसमोरही वेगळेच आव्हान निर्माण झाले. संबंधित संशयित मुलीला जेंव्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले तेंव्हा तिने ते संपूर्ण सोन्याचे मंगळसूत्र मणी आणि पदकासह चक्क गिळून टाकले. या प्रकाराने पोलीस चक्रावून गेले. कुणाला काहीच कळेना.
रंगेहात पकडलेली चोरी अशी गायब कशी झाली, जमिनीत गेली की हवेत गायब झाली. त्यानंतर मात्र चाणाक्ष पोलिसांच्या नेमकी गोष्ट लक्षात आली. त्यांनी तात्काळ तिला वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात नेले. तिथेच तिचे एक्स रे अर्थात क्ष किरण तपासणी केली असता ते सोन्याचे मंगळसूत्र पोटाच्या मोठ्या आंतड्याकडे जात असल्याचे दिसले. त्यावेळी मात्र सर्वांनाच धक्का बसला. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्याबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला महिला व बालकल्या ण विभागाकडे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित मुलीने यापूर्वीही अशा प्रकारे तीन ते चार वेळा चोरी केली होती. यामागे टोळी सक्रिय आहे काय याबाबत तपास सुरू असून सोन्याचे जिन्नस गिळल्यानंतर ते काही तासानंतर शौचावाटे बाहेर पडतात, हा अनुभव त्या टोळीला असावा. बस स्थानक सारख्या गर्दीच्या ठिकाणी लहान लहान मुला-मुलींना पाठवून अशा प्रकारे चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत का, याचा तपास विटा पोलीस करीत आहेत.
लोकांनी उत्सवाच्या काळात सतर्क राहावे. सध्या नवरात्रोत्सवाचा काळ सुरू असल्याने बाजारपेठा, बसस्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी आहे. या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होण्याची शक्यता लक्षात घेता लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी केले आहे.