

मुंबई: सप्टेंबरमध्ये सरासरी ५०० मिमी ते ६०० मिमी पाऊस होतो. मागील १० वर्षाची तुलना केल्यास यंदा दुसऱ्यांदा सप्टेंबरमध्ये पाऊस कमी झाला आहे. पण २०१८ च्या तुलनेत जास्त आहे. २०१८ मध्ये शहरांमध्ये अवघा ५९ मिमी तर उपनगरात ७० मिमी झाला होता.
मुंबई शहर व उपनगरात सप्टेंबर महिन्यात सरासरी ५५० ते ६०० मिमी पेक्षा जास्त पाऊस होतो. गेल्या दहा वर्षात सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसाचा आढावा घेतला असता यावेळी दुसऱ्यांदा कमी पाऊस झाला आहे. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात शहरात १७५ मिमी व उपरागरात २१५ मिमी पाऊस झाला. जवळपास ३०० ते ४०० मिमी पाऊस कमी पाऊस झाला आहे.
मुंबईत गेल्या दहा वर्षांमध्ये २०१९ मध्ये सर्वाधिक पाऊस झाला होता. यात शहर विभागात ८५२ मिमी व उपनगरात ११०१ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर गेल्या सात वर्षात एवढा मोठा पाऊस कधीच झाला नाही. २०२५ मध्ये ६१७ ते ६२० मिमी पाऊस झाला होता.
तलाव क्षेत्रातही कमी पाऊस
शहराला पाणीपुरवठा करणारे बहुतांश तलाव ठाणे जिल्ह्यात आहेत. ठाणे जिल्ह्यातही विशेषत: तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दहा वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा कमी पाऊस झाला आहे. तलाव क्षेत्रात सप्टेंबरमध्ये ७०० मिमी पर्यंत पाऊस पडतो.
यावेळी २५० मिमी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत तलावातील पाण्याची पातळी सुमारे ४ ते ५ टक्क्यांनी घसरली होती.