

विटा : विट्यात गेल्या काही दिवसांपासून एका अल्पवयीन बालकाने उच्छाद मांडला आहे. त्याचे वय साधारणतः १४ ते १५ वर्ष आहे. लोकांचे मोबाईल्स भर दिवसा बाजारपेठ किंवा चौकात गर्दीच्या ठिकाणांरून हातोहात लंपास करणे, पार्किंग किंवा दुकान, शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर लावलेल्या सायकली पळवून नेणे, इतकेच नव्हे तर दुचाकी गाड्यांवरही तो हात मारत आहे. अनेकवेळा अशा सायकली, गाड्या फिरवून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावतो. तर काही वेळा थेट परस्पर नेऊन विकत असल्याचे प्रकार घडत आहेत.
काही दिवसांपूर्वी तो येथील सुतारकी म्हणून भाग आहे त्या ठिकाणी मोटरसायकलवरून फिरताना दिसला. सलग दोन दिवस त्याभागात तो मोटरसायकलवरून फिरत होता. ती गाडी कोणाची तरी अशीच चोरून आणली होती. दोन दिवस गाडी त्याने त्या परिसरात फिरवली आणि परत तशीच सोडून दिली. नवीन भाजी मंडईतील एका दुकानातून १२ हजार ८०० रुपये नेले, त्याला तेथील दुकानदाराने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पण पोलिसांनी त्यास काहीवेळ बसवून ठेवून सोडून दिले. त्यानंतर त्या बालकाचे धाडस वाढले त्याने अलीकडच्या काही दिवसात सोने चांदीच्या दुकानांच्या दागिन्यांवर डल्ला मारायला सुरुवात केली आहे.
सराफाचे लक्ष नाही, हे पाहून तो खुशाल गल्ल्यात हात घालून पैसे काढतो, काच दरवाजा हलकेच उघडून दागिने पळवतो. गेल्या काही दिवसांपासून साखळी उडवणे, पाकीट मारणे असल्या छोट्या मोठ्या चोऱ्याही करत आहे. विशेषतः महिला वर्गात त्याची फार धास्ती पसरली आहे. अनेकवेळा येथील नागरिकांनी त्याला पोलिसांत पकडूनही दिले. पण तो अल्पवयीन अर्थात बाल गुन्हेगार आणि कायद्याच्या भाषेत विधी संघर्ष बालक असल्याने त्याला प्रत्येक वेळी सोडून देण्यात येत आहे. परंतु विटेकर या संपूर्ण प्रकारामुळे त्रस्त झाले आहेत.
कायद्याच्या भाषेत विधी संघर्ष बालक म्हणजे असे बालक १८ वर्षांखालील मुल असते. जे कायद्याच्या विरोधात जाणारे कृत्य करते. आपल्या देशात बाल न्याय (मुलांचे संरक्षण आणि काळजी) अधिनियम, २०१५ अंतर्गत अशा बालकांना हाताळले जाते, अशा बालकांना सामान्य गुन्हेगारांप्रमाणे तुरुंगात पाठवता येत नाही. तर, बाल सुधारगृह किंवा निरीक्षणगृहात ठेवले जाते. त्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांचे पुनर्वसन करणे, शिक्षण देणे आणि समाजात परत आणणे, हा मुख्य उद्देश आहे. परंतु विट्यातील संबंधित विधीसंघर्ष बालकाबाबत स्थानिक पोलीस भलतीच कनवाळू बनली आहेत. परिणामी, लोकांनी जरी त्याला पकडून दिले तरी, काही वेळ पोलीस ठाण्यात बसवून त्याला समज देऊन सोडून दिले जात आहे. त्यामुळे आपण काहीही केले तरी आपल्याला शिक्षा होत नाही, असा त्याचा समज बनला आहे. याचा परिणाम म्हणून तो अशा चोऱ्यांबाबत अधिकच धाडसी बनत चालला आहे. पोलिसांनी वेळीच ही गोष्ट लक्षात घेतली नाही, तर तो नजीकच्या भविष्य काळात विट्यातील अट्टल गुन्हेगार बनू शकतो, अशी शक्यता आणि भीती विटेकरांना वाटत आहे. त्यामुळे त्याला वेळीच सुधारगृहात पाठवून योग्य ते शिक्षा देण्याची गरज आहे, असे लोकांचे मत आहे.