

तासगाव : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे पुतण्याने वृद्ध चुलत्याच्या डोक्यात चिनी मातीची बरणी घालून खून केल्याचे उघडकीस आले. मिरासोा बाबासाो तांबोळी (वय 62) असे मृताचे नाव आहे. या खूनप्रकरणी सुभान उस्मानगणी तांबोळी (23, रा. कवठेएकंद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस नाईक विजय नामदेव गस्ते यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, मिरासोा आणि सुभान हे चुलते-पुतणे आहेत. मिरासोा हे नेहमी सुभान याला व त्याचे आई, वडील यांना शिवीगाळ करीत असत. गुरुवार, दि. 24 रोजी नेहमीप्रमाणे मिरासोा हे सुभान व त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करू लागले. यावेळी सुभान याने चुलते मिरासाो यांना हाताने मारहाण केली. यामध्ये मिरासाो खाली पडले. त्यावेळी त्याने जवळच असलेली चिनीमातीची बरणी घेऊन मिरासोा यांच्या डोक्यात मारली. यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतच मिरासाो यांना उपचारासाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
सुभान याने मिरासोा यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी मिरासोा हे बरणी घेऊन घरातील जिन्याच्या पायर्या उतरत असताना जिन्यावरून पडले व बरणी फुटून मार लागून जखमी झाल्याचे त्याने सांगितले होते. पोलिसांनीही, जखमी होऊन मृत झाले, अशी फिर्याद नोंद केली होती. मात्र मिरासाो यांच्या मृत्यूबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू होती.
सुभान याने चुलते मिरासोा यांचा खून केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील सागर टिंगरे यांना मिळाली. या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक कवठेएकंद गावात आले असता, संशयित सुभान याच्या हालचाली पथकाला संशयास्पद वाटल्याने सुभान याला पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, सुभान याने चुलते मिरासोा यांचा खून केला असल्याची कबुली दिली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.