Sangli Crime : खुनाबद्दल दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास

Sangli murder case: सहा वर्षांपूर्वीची घटना; एकमेकांकडे बघण्याचा वाद
Sangli murder case
शैलेश ऊर्फ पुष्पराज विलास घाटगे व नीलेश विलास घाटगेpudhari photo
Published on
Updated on

इस्लामपूर : एकमेकांकडे बघण्याच्या वादातून युवकाचा तलवारीने वार करून, चाकूने भोसकून खून केल्याबद्दल दोघा भावांना आजन्म कारावासाची शिक्षा येथील जिल्हा न्यायालयाने ठोठावली. शैलेश ऊर्फ पुष्पराज विलास घाटगे (वय 27) व नीलेश विलास घाटगे (28, दोघेही रा. शिगाव, ता. वाळवा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. जिल्हा न्यायाधीश ए. एच. काशीकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. शिगाव येथे साडेपाच वर्षांपूर्वी ही खुनाची घटना घडली होती. या हल्ल्यात अनिकेत ऊर्फ बबलू शिवाजी फार्णे (25, रा. शिगाव) याचा मृत्यू झाला होता.

8 ऑक्टोबर 2019 रोजी शिगाव येथे सायंकाळी युवा क्रांती नवरात्र उत्सव मंडळाची मिरवणूक सुरू होती. अनिकेत व त्याचा मित्र सौरभ चव्हाण मिरवणुकीत होते. रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास मिरवणूक तरुण भारत चौकात आली असता, अनिकेत आणि शैलेश व नीलेश यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून भांडणे झाली. उपस्थितांनी ही भांडणे सोडवली.

नीलेश व शैलेश यांनी अनिकेतचा भाऊ महेश यास शिविगाळ केली. त्यानंतर रात्री अनिकेत व सौरभ हे शैलेश याच्या घराकडे जाब विचारण्यासाठी गेले. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. नीलेश याने तलवारीने अनिकेतच्या तोंडावर वार केला. शैलेश याने चाकू अनिकेत याच्या छातीत भोसकला. चाकूने हातावर वार केले. अनिकेत फार्णे याला विश्वास लोंढे याने धरून ठेवले. त्यात सौरभही जखमी झाला. या हल्ल्यात अनिकेतचा मृत्यू झाला होता.

जखमी सौरभ याने आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी शैलेश, नीलेश, विश्वास यांना अटक करून येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यात 11 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यापैकी फिर्यादी सौरभ चव्हाण, साक्षीदार आरती चव्हाण, अमृता फार्णे, विजय जगताप, स्वराज शिंदे, पंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. सचिन, तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दिलीप व्ही. ढेरे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

न्यायालयाने भा. दं. वि. कलम 302, 324, 201, 504 मध्ये शैलेश, नीलेश घाटगे यांना दोषी धरून त्यांना आजन्म कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. शुभांगी व्ही. पाटील यांनी काम पाहिले. सरकारी पक्षास पोलिस उपनिरीक्षक दिनकर महापुरे, पोलिस हवालदार उत्तम शिंदे, चंद्रशेखर बकरे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news