सांगली : हिंगणगादे येथे पुरात वाहून गेलेल्‍या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला

सांगली : हिंगणगादे येथे पुरात वाहून गेलेल्‍या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला

विटा: पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथे ओढ्याच्या पुरातून शनिवारी वाहून गेलेल्या शाळकरी मुलाचा मृतदेह  आज (दि. १६) सकाळी साडेआठच्या सुमारास सापडला. सोहम नितीन पवार (वय ११) असे त्‍याचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हिंगणगादे ते मंडले वस्ती दरम्यान असलेल्या ओढ्याला पूर आल्याने पाणी पुलावरून वाहत होते. शनिवारी सायंकाळी सोहम त्याच्या मित्राकडे अभ्यासाची वही आणण्यासाठी सायकलवरून पुलावरील पाण्यातून जात होता. त्यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो सायकलसह पाण्यातून वाहून गेला. हा प्रकार ओढ्याच्या बाजूला असलेल्या मुलांनी पाहून आरडाओरड केली. त्यावेळी स्थानिक लोकांनी सोहमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही.

याबाबत माहिती सांगलीच्या आयुष हेल्पलाईन टीमलाही देण्यात आली होती. त्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध घेतल्यानंतर रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोहमचा मृतदेह पुलापासून काही अंतरावर झुडुपात अडकलेल्या अवस्थेत सापडला. सोहम पवार याचे आई-वडील गलाई व्यवसाय यानिमित्त गुजरात राज्यात असतात. तो त्याच्या चुलता आणि आजीजवळ हिंगणगादे गावात राहत होता. सोहमला एक बहीणही आहे. तीही आई-वडिलांसोबत गलाई व्यवसाय निमित्ताने गुजरातमध्येच असते.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news