

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभेचा कालावधी कमी राहिला असल्याने अंधेरी पूर्व मतदारसंघातील निवडणूक बिनविराेध करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज ( दि. १६) केले. (Andheri bypoll election)
पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, " अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढविणार आहेत. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. (Andheri bypoll election) महाराष्ट्रात याआधी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर एक अशीच पोटनिवडणुक झाली होती. मात्र मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून तेव्हाही महत्त्वाची भूमिका घेतली होती. मुंडेच्या परिवारातील कोणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी ती भूमिका होती, असेही पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. वर्ष -दीड वर्षासाठी ही निवडणूक टाळता आली तर बरं होईल. तसेच दीड वर्षांनी म्हणजे तेवढ्याच कालावधीमध्ये निवडणुका हाेतात असे नाही. त्यापूर्वीही निवडणूक हाेवू शकतात, असे सांगत या वेळी पवारांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या रिक्त जागेसाठी पुढील महिन्याच्या ३ तारखेला पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. त्यानंतर निवडणूक आयोगानं अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ठाकरे आणि भाजप-शिंदे गट निवडणुकीत आमने-सामने असणार आहेत. ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदे गटाच्या पाठिशी भाजप असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक ठाकरे आणि भाजप-शिंदे गटाची नसून, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात असल्याची चर्चा सध्या आहे.
हेही वाचा