कोल्हापूर: शिरोळ येथे ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड पाडली बंद | पुढारी

कोल्हापूर: शिरोळ येथे 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड पाडली बंद

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या उसाला ‘एफआरपी’ अधिक ३५० रुपये दराची घोषणा करून तसे पत्र द्यावे, त्याशिवाय ऊस तोडू देणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेत घोसरवाड (ता.शिरोळ) येथे खांडसरी साखर कारखान्याची सुरू असलेली ऊस तोडणी बंद करत ऊस वाहतूकही बंद पाडली. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली आहे. खांडसरी कारखान्याकडून शिरोळ तालुक्यात १८ ते १९ ठिकाणी ऊसतोड सुरू होती. ती ऊसतोड कारखान्याने थांबवत तुटलेला ऊस कर्नाटक राज्यातील कागवाड साखर कारखान्याकडे पाठवल्याचे खाडसरीच्या शेती अधिकाऱ्यांनी सांगितले.

घोसरवाड येथील कुमार सुतार यांच्या शेतात ऊसतोड सुरू असल्याचे समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे आदी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड मजुरांकडून कोयते व खुरपे काढून ऊसतोड बंद पडली. ऊसदराचा आणि एफआरपी अधिक ३५० रुपयांचे पत्र दिल्याशिवाय ऊसतोड करू नये, अशी सक्त सूचना दिल्या.

हेरवाड-तेरवाड रस्त्यावर इतर कारखान्याची ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांना मज्जाव करत दराचा तोडगा निघाल्याशिवाय ऊस तोडू नये, असे सांगितले. तर खांडसरी कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर आडवून ट्रॅक्टरची हवा सोडली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.

शेतकरी संघटनेसोबत कारखानदारांनी योग्य तोडगा न काढल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. साेमवारपासून (दि.१७) आंदोलन तीव्र करणार असल्याची बंडू पाटील यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मलगोडा पाटील, धूळगोडा पाटील, अशोक पाटील, संजय अपराज, प्रभाकर बंडगर आदी कार्यकर्ते व शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button