आटपाडी : करगणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रतिष्ठेच्या झालेल्या लढतीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटाने शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर समर्थक तानाजीराव पाटील गटावर मात करत सत्तांतर केले. शिवसेना युती, भाजप आघाडी आणि रासप अशा तिरंगी लढतीत मतांची विभागणी होऊन भाजपचा विजय सुकर झाला. सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुरेखा होनमाने विजयी झाल्या. Gram Panchayat Election Result
गतवेळी शिवसेनेच्या तानाजी पाटील गटाने स्वबळावर सत्ता कायम राखली होती. यावेळी भाजपचे अमरसिंह देशमुख यांच्या गटाने साथ दिल्याने सेना सत्ता राखणार अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची दणकेबाज सभा, राष्ट्रवादीची समर्थ साथ, नवीन आश्वासक चेहरे भाजपसाठी निर्णायक ठरले. Gram Panchayat Election Result
सेनेच्या तानाजीराव पाटील गटाने भाजपचे अमरसिंह देशमुख गटाशी युती केली. दत्तात्रय पाटील यांच्या पत्नी दीपाली पाटील यांना उमेदवारी दिली. तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर गटाने माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, विट्याचे माजी नगराध्यक्ष विशाल पाटील व भारत पाटील यांच्या गटासोबत आघाडी केली. आणि सुरेखा तात्यासो व्हनमाणे यांना सरपंचपदासाठी उमेदवारी दिली.
सत्ताधारी शिवसेना आणि भाजपची युती या लढतीत सहजपणे बाजी मारेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु भाजपचे राजकीय डावपेच आणि राष्ट्रवादीच्या उमेश पाटील, ज्येष्ठ नेते विजयसिंह पाटील, भारत पाटील यांची समर्थ साथ लाभल्याने भाजपने सरपंचपद आणि आठ जागांवर यश मिळविले.
तिसरी आघाडी म्हणून मैदानात उतरलेल्या रासपने निवडणुकीत रंग भरला. परंतु रासपच्या उमेदवारीचा फायदा भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवाराला झाला. शिवसेनेने प्रस्थापित उमेदवारांना दिलेली उमेदवारी जनतेला पसंत पडली नाही. काही प्रभागामध्ये रासपची साथ भाजपच्या पथ्यावर पडली. तिरंगी लढतीत रासपची भूमिका निर्णायक ठरली. सरपंचपदाच्या लढतीत भाजपच्या सुरेखा तात्यासो होनमाने यांनी २९८० मते घेत विजय संपादन केला. शिवसेनेच्या दिपाली दत्तात्रय पाटील यांना २७६८ मते पडली. तर रासपच्या विद्या सुहास सरगर यांना ४९९ तर अपक्ष कल्पना अशोक सरगर यांना २५१ मते पडली.
हेही वाचा