सांगलीत येणारा गूळ कर्नाटकने अडवला

सांगलीत येणारा गूळ कर्नाटकने अडवला

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातून येथे वसंतदादा मार्केट यार्डात विक्रीसाठी येणारा गूळ कर्नाटक सीमेवर जीएसटी अधिकार्‍यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. सांगली बाजार समितीच्या सदस्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत हा गूळ शेतकर्‍यांचा असल्याचे सांगितल्यानंतर तो सोडून देण्यात आला. दरम्यान, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे हे व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळासह कर्नाटकातील सरकारशी यासंदर्भात भेटून चर्चा करणार आहेत.

येथील मार्केट यार्डात कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गुळाची आवक होते. या ठिकाणी शेतकर्‍यांच्या शेतमालास चांगला दर मिळत असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी गूळ घेऊन येतात. साधारणत: दहा ते बारा गाड्यातून सुमारे 4000 रवे गुळाची आवक येथील यार्डात होते. सोमवारी कागवाड येथे काही गाड्या जीएसटी विभागाच्या अधिकार्‍यांनी अडवल्या. त्यांच्याकडे जीएसटीबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर संबंधित शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर बाजार समितीच्या व्यापारी प्रतिनिधींनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत संबंधित अधिकार्‍यांना हा गूळ शेतकर्‍यांचा असल्याचे पटवून दिले. त्यानंतरच हा गूळ विक्रीसाठी सोडून देण्यात आला.

दरम्यान, सांगली बाजारपेठेत शेतीमालाची आवक वाढण्यासाठी बाजार समितीकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. शेतकर्‍यांचा शेतमाल असेल तर त्यावर कोणत्याही प्रकारचा कर घेतला जात नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ घेऊन कर्नाटक सरकारशी चर्चा करणार असल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news