

कवठेमहांकाळ ः बसप्पावाडी (नाईक वस्ती) (ता. कवठेमहांकाळ) येथे काही दिवसांपूर्वी नागरिकांना मगर दिसल्याने वन विभागाने तत्काळ सज्जता दाखवत परिसराची पाहणी केली. वनपाल अजितकुमार सूर्यवंशी व वनरक्षक परीक्षित जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बसप्पावाडीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून आवश्यक उपाययोजना स्पष्ट केल्या. मगरीचा वावर असलेल्या ठिकाणी विनाकारण जाऊ नये, जनावरे काठावर बांधू नयेत, लहान मुलांना एकटे सोडू नये, अशा सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच, मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनमजुरांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे.
26 नोव्हेंबरपासून मगरीचा वावर आढळून आला नसला तरी नागरिकांच्या मागणीनुसार आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून वन विभागाने त्या ठिकाणी मगर पकडण्यासाठी पिंजरा उभारला आहे. उपवनसंरक्षक सागर गवते व सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनावडेकर, वनपाल, वनरक्षक, रेस्क्यू टीमचे सदस्य सचिन साळुंखे, किरण नाईक, रूपेश साळुंखे, निखिल सुतार तसेच वनमजूर व कर्मचारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ग्रामपंचायत व वन विभागाने नागरिकांना मगरीचा वावर असलेल्या क्षेत्रात न जाण्याचे, सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.