

सांगली ः कवठेमहांकाळ येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेबाबत पदाधिकारी, सदस्य आल्यानंतर तेच याबाबत निर्णय घेतील, अशा भूमिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारासमोर मांडली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी गुरुवारी संबंधित ठेकेदाराची संपूर्ण भूमिका समजून घेतली. या विषयाला बरेच दिवस झाले आहेत, हा विषय न्यायालयातही आहे. त्यामुळे याबाबत काहीच निर्णय सध्या होऊ शकत नसल्याचे प्रशासनाने बैठकीत स्पष्ट केले. कवठेमहांकाळ येथील जिल्हा परिषदेची सुमारे 35 गुंठे जागा विकसित करण्याचा विषय अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सुमारे 2008 पासून हा विषय सुरू आहे. याबाबत सर्व साधारण सभेसह न्यायलयातील अनेक टप्पे पूर्ण झाले आहेत.
2008 साली ठरल्याप्रमाणे ही जागा विकसित करण्यास द्यावी, अशी विकासकाची मागणी आहे. मात्र 2008 च्या करारानुसार ही जागा विकसित करण्यास देण्यास 2017 मधील आणि इतरही सर्वसाधारण सभेत विरोध झाला. याबाबत न्यायालयाने लवाद नेमला होता, मात्र लवादासमोरही याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. याबाबत संबंधित विकासकाकडून जुन्या करारानुसार जागा विकसित करण्यास द्यावी, याबाबत प्रशासनाकडे तगादा लावला आहे. संबंधित ठेकेदाराने जागा विकसित करण्यास न दिल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. सीईओ नरवाडे यांनी गुरुवारी संबंधित ठेकेदाराची भूमिका व म्हणणे ऐकून घेतले. मात्र लोकनियुक्तसदस्य आल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.