

Atpadi Panchayat Samiti Chairperson and Deputy Chairperson unopposed
आटपाडी : आटपाडी पंचायत समितीवर अखेर शिवसेना (शिंदे गट)ने सत्ता प्रस्थापित केली असून सभापतीपदी दत्तात्रय पाटील तर उपसभापतीपदी कल्पना देवेंद्र पुसावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी भाजपकडून कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध पार पडली.
पंचायत समितीच्या निवडणुकीत आठपैकी पाच जागा जिंकत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, विठलापूर गणाचे विजयी उमेदवार दिलीप हेगडे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने शिवसेनेचे मताधिक्य कमी झाले असले तरी बहुमत कायम राहिले.
आज झालेल्या पदाधिकारी निवड प्रक्रियेत शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने दत्तात्रय पाटील यांनी सभापतीपदासाठी तर कल्पना पुसावळे यांनी उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, विरोधी भाजपकडून दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
गत निवडणुकीत भाजपने आठपैकी सहा जागा जिंकत पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली होती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आमदार सुहास बाबर आणि तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, अनिल पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तसेच स्वाभिमानी आघाडीचे भारत पाटील यांच्या सहकार्याने आघाडी करत सत्तापालट घडवून आणला.
गेल्या साडेतीन वर्षांपासून पंचायत समितीचा कारभार प्रशासकीय यंत्रणेकडे होता. आता दत्तात्रय पाटील यांनी सभापतीपदाचा तर कल्पना पुसावळे यांनी उपसभापतीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी दत्तात्रय पाटील यांनी सर्वांना सोबत घेऊन आटपाडी तालुक्याच्या विकासाला गती देण्याची ग्वाही दिली.