

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी तालुक्याचे राजकीय चित्र पूर्णतः बदलून टाकले आहे. शिवसेना शिंदे गटाने जिल्हा परिषदेच्या खरसुंडी व दिघंची या दोन महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून करगणी गटातही यश संपादन केले. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या निंबवडे गटात भाजपने विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवला.
पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने मोठी कामगिरी करत आठपैकी पाच जागा जिंकून सत्तापालट घडवून आणला. खरसुंडी, नेलकरंजी, दिघंची, विठ्ठलापूर व करगणी या गणांत शिवसेनेने बाजी मारली. दुसरीकडे निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपने निंबवडे, घरनिंकी व करगणीतील माडगुळे या तीन जागा जिंकत क्लीन स्वीप केला.
खरसुंडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदीप भोसले यांनी भाजपचे चंद्रकांत भोसले यांचा तब्बल २,७५० मतांनी पराभव करत मागील पराभवाची परतफेड केली.
खरसुंडी पंचायत समिती गणात भाजपच्या डॉ. मीनाक्षी पुजारी यांनी शिवसेनेच्या लता पुजारी यांचा पराभव केला, तर नेलकरंजी गणात शिवसेनेच्या सुनीता सरगर यांनी भाजपच्या पौर्णिमा म्हारगुडे यांना पराभूत केले.
करगणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक मासाळ यांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपचे दादासाहेब हुबाले यांचा अवघ्या ६८० मतांनी पराभव केला. करगणी पंचायत समिती गणात शिवसेनेचे दत्तात्रय पाटील यांनी भाजपचे संभाजीराव पाटील यांचा २,८९५ मतांनी दारुण पराभव केला.
मात्र माडगुळे गणात भाजपचे दादासाहेब मोटे यांनी शिवसेनेचे रामदास सूर्यवंशी यांचा अवघ्या ११२ मतांनी पराभव करत चुरशीची लढत जिंकली.
दिघंची जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील यांनी पहिल्याच निवडणुकीत भाजपचे कल्लाप्पा कुटे यांचा तब्बल ४,२२६ मतांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला.
दिघंची पंचायत समिती गणात शिवसेनेच्या कल्पना पुसावळे व दिलीप हेगडे यांनी अनुक्रमे भाजपच्या वंदना शिंदे व वैभव हेगडे यांचा पराभव करत गटात क्लीन स्वीप केला.
पडळकर विरुद्ध मोटे अशी प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या माधवी पडळकर यांनी शिवसेनेच्या ॲड. विद्या मोटे यांचा १,०१९ मतांनी पराभव केला. माधवी पडळकर या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी असून, या विजयामुळे पडळकर गटाचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे.
घरनिंकी गणात भाजपच्या वैशाली कातुरे यांनी शिवसेनेच्या अहिल्या पुकळे यांचा, तर निंबवडे गणात भाजपचे जयवंत सरगर यांनी शिवसेनेचे सचिन मोटे यांचा पराभव करत भाजपचा गड भक्कम केला.
आटपाडी तालुक्यातील या निकालांमुळे शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यातील थेट राजकीय संघर्ष स्पष्ट झाला असून, काही ठिकाणी सत्तापालट तर काही ठिकाणी वर्चस्व कायम राहिले आहे. या निकालांचा आगामी काळातील तालुक्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.