विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्यात आमदार अनिलराव बाबर यांच्या व्याह्याच्या घरात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिन्यासह तीन लाख रुपयांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे घरातील लोक झोपली असताना बेडरुमच्या खिडकीचे ग्रील तोडून ही घरफोडी झाली. ही घटना आज (दि.२८) मध्यरात्री येथील सिद्धिविनायक कॉलनी येथे घडली. या प्रकरणी पोपटराव जाधव यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साळशिंगे रोडवरील सिद्धिविनायक कॉलनीमध्ये पोपटराव जाधव यांचे घर आहे. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते आपल्या पत्नीसोबत या घरामध्ये राहतात. आज मंगळवारी (दि.२९) सकाळी उठल्यानंतर जाधव यांना आपल्या घरी चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी याबाबतची फिर्याद विटा पोलिसात दिली.
पोपटराव जाधव हे आमदार अनिलराव बाबर यांचे व्याही आणि माजी नगरसेवक अमोल बाबर यांचे सासरे आहेत. या घरफोडीत ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या २० ग्रॅम वजनाच्या लहान १० अंगठ्या, ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या २० ग्रॅम वजनाच्या २ वेडन अंगठ्या आणि १ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे ३ लाख ५ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरिक्षक संतोष डोके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यासह घटनास्थळी श्वानपथक मागवण्यात आले. तसेच चोरी झालेल्या ठिकाणी फिंगर प्रिंटसही घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके करीत आहेत.
हेही वाचा;