

इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथे पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जमावाने दूध संस्थेची, दुचाकींची तसेच वॉटर एटीएमची तोडफोड केली. तसेच संस्थेतील कर्मचार्याला मारहाण करून व डोक्यात हातोडा घालून जखमी केले. या हल्ल्यात सुमारे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजता घडली. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात उपसरपंचासह 20 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.
याप्रकरणी उपसरपंच मदन शिवाजी पाटील, ओंकार मदन पाटील (दोघे रा. रेठरेधरण), मनोज पाटील (रा. मांगले, ता. शिराळा) व अनोळखी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रशांत प्रभाकर पाटील (रा. रेठरेधरण) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या श्रेयवादावरून दोन दिवसापूर्वी एका गटाने उपसरपंच मदन पाटील यांच्या घरावर हल्ला करत कुटुंबातील महिलांना मारहाण केली होती. याचा राग मनात धरत शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मदन पाटील, त्यांचा मुलगा ओंकार व जमावाने म्हसोबा दूध संस्थेवर काठ्या व हातोडा घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात जमावाने संस्थेतील फॅट मशीन, वजन-काटा, प्लास्टिक खुर्च्या काऊंटर, वॉटर एटीएम, काचा, दोन दुचाकींची तोडफोड करत 91 हजारांचे नुकसान केले. तसेच फिर्यादी प्रशांत पाटील यांच्या डोक्यात हातोडा घालून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.