

इस्लामपूर : येथील इस्लामपूर - कापूसखेड रस्त्यालगतच्या मोटर गॅरेजसमोर लावलेल्या वाहनांना लागलेल्या आगीत दुचाकी, मोटार, टेम्पो, गॅरेज व घरातील साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. गॅरेज मालक योगेश विलास सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील योगेश सूर्यवंशी यांचे नेहरूनगर परिसरात गॅरेज व त्याला लागूनच घर आहे. सोमवारी रात्री गॅरेज बंद केल्यानंतर ते जेवण करून घरात झोपले होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास टायर फुटल्याचा आवाज झाल्याने योगेश जागे झाले. ते व त्यांची पत्नी घरातून बाहेर आले. त्यावेळी गॅरेजसमोर लावलेल्या दुचाकीने पेट घेतल्याचे दिसले. त्यांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भडकतच गेली.
दुचाकीशेजारी असलेल्या मोटारीसही आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. गॅरेजच्या अंगणात लावलेल्या अन्य मोटारीही आगीने वेढल्या गेल्या. सूर्यवंशी यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आग भडकतच गेली. आगीच्या झळांनी सूर्यवंशी यांचे गॅरेज व घरही वेढले गेले.
गॅरेजमध्ये दुरुस्तीकरिता आलेली मोटार (क्र. एमएच 12 टी 1024), मोटार (एमएच 09 बीबी 5272), मोटार (एमएच 12 बीव्ही 4608), दुचाकी (एमएच 10 एडी 6877), दुचाकी (एमएच 50 पी 4728), टेम्पो (एमएच 12 जीटी 9625) यांसह घरातील प्रापंचिक साहित्य, कपडे, धान्य, भांडी, टीव्ही, फ्रीज, पिठाची गिरणी, गॅरेजमधील एअर कॉम्प्रेसर, इलेक्ट्रिक गन, स्पॅनर सेट, ऑईल जॅक, ग्रीअर गाडा, टुल बॉक्स, कीट्स स्पेअरपार्ट, अॅक्सेसरीज जळाले.
आग लागताच नागरिक जमा झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. मात्र आग लागून पाऊण तास झाला तरी, अग्निशमनचे पथक दाखल झाले नव्हते. अगदी 300 - 400 मीटरवर अग्निशमन विभागाचे कार्यालय असतानादेखील ते वेळेत आले नाहीत, अशी चर्चा घटनास्थळी होती.