

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा
डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लेकीला बारावीच्या नीट परीक्षेच्या चाचणीत कमी गुण पडल्याने तिच्या मुख्याध्यापक पित्याने लाकडी खुंट्याने अमानुष मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. साधना धोंडिराम भोसले (वय १९, रा. नेलकरंजी) असे मृत मुलीचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी मुलीचा वडील धोंडिराम भगवान भोसले याला आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे. नेलकरंजी येथील धोंडिराम हा नेलकरंजी गावात माध्यमिक विद्यालयावर मुख्याध्यापक आहे.
त्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मुलगी साधनाने दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळवले होते. बारावी नीटची परीक्षा देऊन डॉक्टर व्हायचे तिचे स्वप्न होते. अकरावी उत्तीर्ण होऊन ती आटपाडीत बारावीत शिकत होती.
आटपाडी येथील निवासी विद्यालयात ती साधना भोसले धोंडिराम भोसले राहायची; मात्र दोन दिवसापूर्वी ती घरी आली होती. महाविद्यालयात 'नीट' अभ्यासक्रम चाचणी परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये तिला कमी गुण पडले होते. त्यामुळे संतापलेल्या धोंडिरामने घरातील जात्याच्या लाकडी खुंट्याने शुक्रवारी रात्री तिला अमानुष मारहाण केली.
मारहाणीत साधनाच्या डोक्याला आणि शरीराला जबर मार लागला होता. ती गंभीर जखमी होती. तरीही तिला रुग्णालयात नेले नाही. शनिवारी दुसऱ्या दिवशी सकाळी धोंडिराम विद्यालयात योग दिन साजरा करण्यासाठी गेला होता. कार्यक्रम झाल्यावर तो घरी आला. घरी आल्यावर साधना बेशुद्ध पडल्याचे दिसले.
त्यानंतर तिला रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी रात्री मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर आटपाडी पोलिस ठाण्यात मुलीची आई प्रीती यांनी फिर्याद दाखल केली. आरोपी धोंडिरामला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस निरीक्षक विनय बहीर तपास करत आहेत.