गुणवत्ता शोध चाचणीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद

दैनिक पुढारी - सांगली जिल्हा परिषदेचा अनोखा उपक्रम; 39 हजार 535 विद्यार्थ्यांनी एकाचवेळी दिली ऑनलाईन चाचणी
Sangli News
सांगली : दैनिक ‘पुढारी’ आणि सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतलेल्या ऑनलाईन गुणवत्ता शोध चाचणीची नोेंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये झाली. या विक्रमाची घोषणा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असा कार्यक्रम शुक्रवारी सांगली जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाला. या कार्यक्रमात ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’चे अधिकृत निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडून दैनिक ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी हा गौरव स्वीकारला. यावेळी डावीकडून मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे, ‘पुढारी’चे आयटी आणि डिजिटल हेड विजय नाईक. (छाया ः सचिन सुतार)
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्ह्यातील गाव, वाडी, वस्ती, दुर्गम भागातील इयत्ता चौथी, सहावी आणि सातवीच्या 39 हजार 535 विद्यार्थ्यांनी 136 केंद्रशाळांतून ऑनलाईन गुणवत्ता शोध चाचणी दिली. ऑनलाईन चाचणीत एकाचवेळी जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागाचा हा विक्रम प्रस्थापित झाला आहे. दैनिक ‘पुढारी’ आणि सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतलेल्या या चाचणीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. दैनिक ‘पुढारी’ व सांगली जिल्हा परिषदेचा हा मोठा सन्मान मानला जात आहे.

ऑनलाईन गुणवत्ता शोध चाचणीत जास्त विद्यार्थी सहभागी झाल्याच्या विक्रमाची घोषणा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, असा संयुक्त कार्यक्रम शुक्रवारी सांगली जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाला. दैनिक ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड प्रमुख उपस्थित होते.

Sangli News
पुढारी टॅलेंट सर्च एक्झाममध्ये यंदाही मुलीच ‘लै भारी’..!

ऑनलाईन गुणवत्ता शोध चाचणीत जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागाच्या विक्रमाची घोषणा करण्यासाठी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’चे निर्णय अधिकारी संजय जाधव उपस्थित होते. त्यांनी विक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र देऊन डॉ. योगेश जाधव, तृप्ती धोडमिसे व मोहन गायकवाड यांचा सत्कार केला. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ हे आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्शी संलग्न आहे. एशियन प्रोटोकॉल ऑफ रेकॉर्डचे पालन आणि काटेकोर निकषांद्वारे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती, उपक्रम आणि प्रकल्पांची निवड केली जाते. त्यानुसार दैनिक ‘पुढारी’ व सांगली जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ऑनलाईन गुणवत्ता शोध चाचणीत एकाचवेळी विक्रमी संख्येने विद्यार्थी सहभागाच्या विक्रमाची नोंद झाली आहे.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्चे अधिकृत निर्णय अधिकारी संजय जाधव म्हणाले, ऑनलाईन गुणवत्ता चाचणीत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त संख्येचा विक्रम पुढारी पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने जिल्हा परिषद, सांगली यांच्या सहकार्याने केला. 10 मार्च 2025 ते 7 एप्रिल 2025 या कालावधीत घेतलेल्या या परीक्षेत 39 हजार 535 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. गणित, इंग्रजी, मराठी आणि बुद्धिमत्ता या विषयांमधील विद्यार्थ्यांच्या प्रावीण्याचे मूल्यांकन करणे हे या ऑनलाईन परीक्षेचे उद्दिष्ट होते. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये एक नवीन बेंचमार्क स्थापित केल्याबद्दल आम्ही पुढारी पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जिल्हा परिषद, सांगली यांचे मनापासून अभिनंदन करतो. हा केवळ सहभागी विद्यार्थ्यांच्या संख्येचा विक्रम नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या दृढनिश्चयाचे आणि अमर्याद क्षमतेचे प्रतीक आहे. आम्ही सर्व सहभागी विद्यार्थी, त्यांच्या शाळा, त्यांचे कुटुंब आणि शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो. पुढारी पब्लिकेशन्स प्रा. लि.,चे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे यांनी प्रास्ताविक केले.

देशाला दिले ऑनलाईन चाचणीचे मॉडेल : तृप्ती धोडमिसे

मुलांच्या मानसिकतेचा विचार करून टॅबद्वारे ऑनलाईन चाचणी झाली. त्यासाठी चांगले सॉफ्टवेअर बनवले. चाचणीत कोणताही अडथळा आला नाही. सर्व प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली. विद्यार्थी, शिक्षक, पालक आदी सर्वच घटकांनी या परीक्षेबद्दल समाधान व्यक्त केले. ही चाचणी यशस्वी होण्यात दैनिक ‘पुढारी’ आणि शिक्षण विभागाचे योगदान महत्त्वाचे ठरले. यानिमित्ताने शिक्षण प्रक्रियेत मोठे काम झाले. या उपक्रमाने राज्याला, देशाला ऑनलाईन चाचणीने मॉडेल तयार करून दिले. यापुढील चाचण्याही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी दैनिक ‘पुढारी’चे खूप आभारी आहोत, असे उद्गार मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी काढले.

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थीही सक्षम व्हावेत : डॉ. योगेश जाधव

डॉ. योगेश जाधव म्हणाले, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. खासगी शिक्षण संस्था हे बदल, नवे तंत्रज्ञान गतीने आत्मसात करतात. त्याची शिक्षण प्रक्रियेत अंमलबजावणी करतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. हे तंत्रज्ञानही खासगी शाळेत वापरले जात आहे. मुलांना पुढील स्पर्धा परीक्षांसाठी, नव्या युगासाठी तयार केले जात आहे. पूर्वी दहावी, बारावीच्या परीक्षांना मोठे महत्त्व होते. ते आता नीट, जेईई परीक्षांना आले आहे. सर्वच क्षेत्रात प्रवेश परीक्षांना मोठे महत्त्व आले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही हा अनुभव यावा, स्पर्धेच्या युगासाठी तेही सक्षमतेने तयार व्हावेत, या उद्देशाने ‘पुढारी’ने या ऑनलाईन चाचणीचे आयोजन केले.

Sangli News
कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी दैनिक ‘पुढारी’चे योगदान अपूर्व!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news