

कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर पहिल्यांदा घेण्यात आलेल्या ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’मध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, त्या ‘लै भारी’ ठरल्या आहेत. जिल्हास्तरावर चौथीमधून आरोही पाटील, सातवीतून राधिका जाधवने प्रथम क्रमांक पटकावला. शहरस्तरीय गुणवत्ता यादीत चौथीमध्ये हर्षित सामुद्रे व सातवीत अथर्व वाडकर हे प्रथक क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
दै. ‘पुढारी’ व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच दै. ‘पुढारी’ टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेच्या धर्तीवर 28 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या ‘पुढारी टॅलेंट-सर्च एक्झाम’ परीक्षेला शहर, जिल्ह्यातून सुमारे 22 हजार विद्यार्थी बसले होते. तिसरी ते आठवीच्या मराठी व सेमी इंग्लिश, इंग्लिश माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील 185 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित दोन तासांची परीक्षा होती. दोनशे गुणांसाठी विद्यार्थ्यांना शंभर प्रश्न विचारण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून इयत्ता 4 थीमधून आरोही संतोष पाटील (विद्यामंदिर कौलगे, ता. कागल- 186 गुण) हिने प्रथम क्रमांक पटकावला. निकुंज नरेंद्र नकाते (श्री परशुराम विद्यालय राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी-184 गुण) दुसरा क्रमांक; अथर्व राजेश पाटील (विद्यामंदिर नाधवडे, ता. भुदरगड- 182 गुण) संपादन करीत तिसरा क्रमांक मिळविला. जिल्ह्यातून इयत्ता 7 वीमधून राधिका नामदेव जाधव (विद्यामंदिर पळशिवणे, ता. भुदरगड- 196 गुण) हिने प्रथम क्रमांक मिळवला. श्रेयान विक्रम वागरे (केंद्र शाळा विद्यामंदिर गुडाळ, ता. राधानगरी- 194 गुण), शार्वी युवराज पाटील (विद्यामंदिर घुडेवाडी, ता. राधानगरी- 190 गुण) मिळवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हा व तालुका, शहरस्तरावर भरघोस बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.