

सांगली : जून हा झाडं लावायचा महिना, पण सांगली शहरात मात्र हा झाडं तोडायचा महिना करून ठेवला आहे. शंभरफुटी, स्फूर्ती चौक, मिरज रोडवरील झाडं दिवसाढवळ्या तोडली गेली, त्यावर काहीही कारवाई झाली नाही. रविवारी कर्नाळ रोडवर पेट्रोल पंपाच्या दारातील पिंपळाच्या झाडाची फांदी तोडली आणि एक, दोन नाही, तर तब्बल 13 पक्षी जमिनीवर आपटून हकनाक मेले, तर तीन पक्षी जखमी झाले. घरटी उद्ध्वस्त झाली. पक्ष्यांच्या जिवाची किंमत न समजलेली महापालिका याबाबत कशी आणि कधी कारवाई करणार, असा सवाल पक्षीप्रेमींमधून होतो आहे.
कर्नाळ रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या दारात भला दांडगा पिंपळ आहे. ते शेकडो पक्ष्यांचं घर आहे. पहाटे आणि संध्याकाळी हे झाड पक्ष्यांच्या किलबिलाटानं गजबजलेलं असतं. पण रविवारी सकाळी या झाडाची एक फांदी तोडण्यात आली. ना कसली परवानगी, ना कसली मागणी. ही फांदी तोडली आणि त्यावरील पक्षी ठार झाले. महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य प्रदीप सुतार तातडीनं घटनास्थळी गेले, पण तोवर पक्ष्यांचे बळी गेले होते. काही पक्षी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. सुतार यांनी वन विभागाला तत्काळ माहिती दिली. तसेच जखमी पक्ष्यांवर उपचारासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलं.
झाडावर असलेले पक्षी आणि घरट्यांचा कसलाही विचार न करता आणि रीतसर वृक्ष संवर्धन समितीची कोणतीही परवानगी न घेता फांदी तोडण्यात आली. या फांदीवर 16 पक्षी होते, त्यातले 13 मेले. गायबगळा आणि नाईट हेरॉन जातीचे हे पक्षी होते. त्यांची घरटीही उद्ध्वस्त झाली. या पक्ष्यांना 1972 वाईल्ड लाईफ अॅक्ट शेड्यूल 4 मध्ये संरक्षण आहे. त्यांची घरटी उद्ध्वस्त करणे, त्यांना मारणे हा गुन्हा आहे. घटनेचा पंचनामा केला असून कारवाईबाबत सूचना दिल्या असल्याची माहिती प्रदीप सुतार यांनी दिली.
पावसाळा तोंडावर असताना वृक्ष लागवड करायची सोडून मागील महिन्यात 20 तारखेला स्फूर्ती चौक ते आलदर चौक या मार्गावरील झाडांची कत्तल करण्यात आली होती. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांच्या सूचनांना न जुमानता ही कत्तल करण्यात आली. या घटनेची चौकशी करून बेजबाबदार अधिकारी तसेच अर्बन ट्री अॅक्ट मोडणार्या ठेकेदारांविरुध्द कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी, अशी लेखी मागणी आयुक्तांकडे केली असतानाही त्याबाबत काहीही कारवाई केली नसल्याची खंत प्रदीप सुतार यांनी व्यक्त केली.