

सांगली : महापालिकेच्या ताफ्यातील सर्व 275 वाहनांना अत्याधुनिक जीपीएस प्रणालीखाली आणण्याचे काम सुरू आहे. घंटागाडी, जेसीबी, पाणी टँकर्स, अग्निशमन वाहने ते अधिकार्यांची वाहने, या सर्वांना जीपीएस प्रणालीखाली आणले जात आहे. वाहन कधी, कुठे फिरले, किती फिरले, किती अंतर चालले, कुठे थांबले, ही सर्व माहिती मोबाईल अॅपवर नागरिक व प्रशासनाला दिसणार आहे. कचरा संकलन वाहनांचे लाईव्ह ट्रॅकिंग नागरिकांना पाहता येणार आहे.
आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या सर्व वाहनांना जीपीएस प्रणाली बसवली जात आहे. ई-गव्हर्नन्स, घनकचरा व्यवस्थापन सुधारणा आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत एक अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय कार्यान्वित केला जात आहे. ही प्रणाली लागू होणे म्हणजे महापालिकेच्या डिजिटल गव्हर्नन्समधील एक मोठी झेप आहे. आयुक्त सत्यम गांधी यांच्या स्पष्ट, ठाम आणि कठोर निर्देशानुसार ही तंत्रज्ञान व्यवस्था ‘मिशन मोड’मध्ये राबविण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे महापालिकेच्या सेवा जास्त जबाबदार, अधिक विश्वसनीय आणि पारदर्शक बनणार आहेत. याचा थेट लाभ शहरातील नागरिकांना मिळणार आहे. वाहन कुठे आहे, किती वेळ थांबले, कोणता मार्ग अवलंबला, मार्ग बदलला का, किती अंतर चालले याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या तक्रारींवर प्रशासकीय स्तरावर तत्काळ कारवाई शक्य होणार आहे.
घंटागाड्या, पाणी टँकर्स, सीवरेज टँकर्स, स्वच्छता वाहने, कंत्राटी वाहने, आपत्कालीन प्रतिसाद पथके या सर्वांची मार्गावरील उपस्थिती, वेळापत्रकाचे पालन आणि कामगिरी आता दर सेकंदाला कळणार आहे. अग्निशमन दल, आरोग्य विभाग, आपत्कालीन स्वच्छता पथके यांचा रिस्पॉन्स टाईम लक्षणीयरीत्या सुधारणार आहे.
पारदर्शकता, तत्पर सेवा हा उद्देश...
यावेळी आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, महापालिकेच्या सर्व वाहनांना जीपीएस प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. यामध्ये कोणतीही शिथिलता चालणार नाही. काम वेळेत व गतीने पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. वाहनांचा गैरवापर, नियमांचे उल्लंघन किंवा मार्गभंग झाल्यास चालक, ठेकेदार किंवा अधिकार्यांवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना विश्वास आणि वेळेवर सेवा देणे हा उद्देश यामागे आहे.