

मिरज ः महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचा उमेदवार आझम काझी याच्यासह आठजणांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिरज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिरजेतील प्रभाग क्रमांक सहामधून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रजिया काझी यांचा मुलगा आझम काझी याला माजी महापौर मैनुद्दीन बागवान, जरीना बागवान आणि नर्गिस सय्यद यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. एक वर्षापूर्वी मिरजेतील स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून अफगाण हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काझी याच्यासह अस्लम काझी, शोएब काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजिरे, अल्ताफ रोहिले व मोहसिन गोदड यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर आझम काझी व इतर
आरोपींविरोधात पोलिस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आझम काझी याच्यासह आठजणांना सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. या कारवाईमुळे निवडणूक प्रचार व स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री पवार काय बोलणार?
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक उमेदवारांना निवडणुकीत उभे केले आहे. त्यातून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचवेळी सांगली महापालिका क्षेत्रातील अजित पवार गटाचा उमेदवार काझी याच्यावर हद्दपारीची कारवाई झाली आहे. प्रचारासाठी उपमुख्यमंत्री पवार आज, शुक्रवारी मिरज येथे येत आहेत. सभेत ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिन्याभरापूर्वी पक्षप्रवेश
आझम काझी हा राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रजिया काझी यांचा मुलगा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रजिया काझी गट राष्ट्रवादी शरद पवार पक्षात कार्यरत होता. महिन्याभरापूर्वी माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह मिरजेतील प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी आझम काझी यानेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला होता.