

जालिंदर हुलवान
मिरज : महापालिका अस्तित्वात येऊन 27 वर्षे होत आली, पण महापालिकेच्या अनेक कारभाऱ्यांना मिरज शहरातील समस्या सोडविण्यात काही यश आलेले नाही. काहींनी मात्र काही ठिकाणी चांगली कामे केलेली दिसतात. आजही अनेक कामे प्रलंबित आहेत. एकीकडे शहराला भकास स्वरूप आले आहे आणि दुसरीकडे काही म्होरक्यांचा मात्र विकास होत आहे. अत्यंत खराब रस्ते, नेहमी ड्रेनेज आणि कचऱ्याचे साम्राज्य, 100 कोटी खर्चूनही पिण्यासाठी मिळणारे दूषित, गढूळ आणि अपुरे पाणी, याही समस्या गंभीर बनत आहेत. गरज नसताना 1998 मध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड अशी एकत्रित महापालिका अस्तित्वात आली. पण आजअखेर या 27 वर्षांमध्ये मिरजेला काय मिळाले?
कोट्यवधी रुपयांचा निधी मिरजेत केंद्र व राज्य शासनाकडून मिळत गेला. पण तो निधी कुठे मुरला? खराब आणि अरुंद रस्ते, ही एक मिरज शहरातील मोठी समस्या. बहुतांशी रस्ते अनेक वर्षांपासून रुंदीकरणाच्या प्रतीक्षेतच. लोकसंख्या, वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे आणि दुसरीकडे अतिक्रमणांमुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंदच होत आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता, बायसिंगर लायब्ररीपासून एमआयडीसीकडे जाणारा रस्ता, सुखनिवास हॉटेल ते शिवाजी स्टेडियम, खंडोबा देवालय ते गुरुवार पेठ, रेल्वे स्थानक ते बस स्थानक, दर्गाह रस्ता, हिरा चौक ते शहर पोलिस ठाणे, तहसील कार्याल व कोर्ट रस्ता, सराफ कट्टा ते महाराणा प्रताप चौक, चर्च रस्ता, गांधी चौक ते शिवाजी पुतळा या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण झाले नाही. येथील कार्यालय रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेकवेळा सुरू होऊन बंद पडते. त्यामुळे तो रस्ता रुंद कधी होईल, हे कोण सांगणार?
गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीमधील काही रस्ते खराब आहेत. काही रस्ते खराब होत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख रस्ते खराबच आहेत. सांगली-मिरज रस्त्याकडून येणारा हा मुख्य रस्ता तर पूर्ण खराब आहे. मोकाट कुत्री, भटकी जनावरे, माकडांचा उच्छाद याही समस्या आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त कायमचा करावा, नसबंदी करणे, कायमस्वरूपी डॉग व्हॅन मिरजेसाठी ठेवून कर्मचारी मिरजेतील नेमण्याची गरज आहे. भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अधू बनावे लागले आहे.
ऐतिहासिक किल्ल्यासह अनेक वास्तू जतन करण्याची गरज आहे. शहरातील ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. येथील अनेक वस्तू या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लक्ष्मी मार्केटच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रिकाम्या खोल्यांमध्ये संग्रहालय करता येऊ शकते. मिरज ही संगीतनगरी असल्याने संगीत क्षेत्रातीलही अनेक ऐतिहासिक वस्तू येथे उपलब्ध आहेत. मिरजेच्या इतिहासाची साक्ष देणारी कागदपत्रे उपलब्ध आहेत. पण त्यांना संग्रहालय मात्र नाही.
मिरजेत कचरा आणि घाण ही आणखी एक मोठी समस्या. शहरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे. रिक्षा घंटागाड्यांची सोय असूनही त्या गाड्या अनेक ठिकाणी नियमित येत नाहीत. कोपऱ्या-कोपऱ्याला कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. यातून शहराची सुटका कोण करणार? शहरात बेकायदा बांधकामे व अतिक्रमणांचा सपाटा सुरूच आहे. शहरात दररोज वाढत असणाऱ्या झोपड्या, रेल्वे स्थानक, एस.टी. स्टँड व अन्य ठिकाणी असणाऱ्या खोक्यांमुळे, हातगाड्यांमुळे शहराला जणू बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
मिरजेतील अनेक उद्याने भकास झाली आहेत. लहान-मोठी अशी 13 उद्याने आहेत. त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त उद्यानांना भकास स्वरूप आले आहे. ज्याप्रमाणे मार्केटमधील गांधी उद्यान चकाचक होत आहे, तशी सर्व उद्याने चकाचक होण्याची गरज आहे. शहरातील काही राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांकडेही लक्ष दिले गेले नाही. शहरात एकूण 24 पुतळे आहेत. त्यापैकी निम्म्या पुतळ्यांच्या परिसराची दुरवस्था आहे. एखादी चुकीची दुर्घटना घडली, की सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली जाते, त्याची चर्चा होते. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात नाहीत. खोकीविरहित शहर करण्याच्या नादात मिरजेतील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काढलेल्या खोक्यांचे पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे शहरात दिसली जागा की टाक खोके, हा प्रकार काही वर्षांपासून सुरू आहे.
महापालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या मिरजेतील शाळा क्रमांक सात, जिजामाता विद्यालय व काही अपवाद वगळता अनेक शाळा या विद्यार्थी नसल्याने अक्षरश: ओस पडलेल्या आहेत. येथील नावाजलेल्या मिरज हायस्कूलच्या जागेवर गाळेधारकांना बांधकाम करून देण्यात काही कारभाऱ्यांनी धन्यता मानली आले. फुटबॉल या खेळातही मिरजेचा लौकिक आहे. फुटबॉल या खेळाची मिरजेला मोठी परंपरा आहे. फुटबॉल खेळण्यासाठी असणाऱ्या छत्रपती शिवाजी क्रीडांगण या एकमेव क्रीडांगणाकडे दुर्लक्ष होते. कोट्यवधी रुपये यासाठी खर्च करण्यात आला. मात्र या क्रीडांगणामध्ये जे पाणी साचते, ते आजही तसेच साचतेय. हे क्रीडांगण आहे की तलाव, असा प्रश्न आजही तसाच आहे.