

Sangli crime News
मिरजेतील शासकीय रुग्णालयात जन्म होऊन अवघे ७२ तास झालेल्या नवजात अर्भकालाच पळविले. झाले! झाडून सारी यंत्रणा गॅसवर. घटना घडल्यावर रुग्णालय प्रशासन, पोलिस प्रशासन आदींची एकच धावपळ. समाजमाध्यमात संताप व्यक्त होऊ लागला. तर्कवितर्क लढविण्याचा खेळ सुरू झाला. अखेर ६० तासांनंतर संबंधित बाळ मिळाले. अगदी सुखरूप. चक्रावलेल्या यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला. ६० तासांच्या या थरारनाट्धावर प्रकाशझोत...
मिरज शासकीय रुग्णालय म्हणजे गरीबांचा आधारवड. याच रुग्णालयात सांगोला तालुक्यातील कविता आलदर या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला होता. मुलगा होता. रुग्णालयात सर्व काही सुरळीत सुरू होते. शनिवार, दि. ३ मे रोजीचा दिवसा उजाडला आणि रुणालय प्रशासनाची झोप उडाली. सकाळी दहाच्या सुमारासची वेळ. मिरज शासकीय रुग्णालयात नेहमीची घाईगडबड. याचवेळी एका महिलेची देखील चलबिचल सुरू होती. एक महिला तीन दिवसांपासून रुग्णालयात सगळ्यांसोबत हसत खेळत बोलत होती. सर्वांचा विश्वास संपादन करत होती. बाळंतिणीची नातेवाईक असल्याची तिची बतावणी खरे तर ती करत होती रेकी. रेकी शब्द तिला माहिती नसेलही कदाचित पाहणी, टेहळणी करून ती कोणते बाळ पळवायचे ते ती ठरवत होती.
प्रसूतिगृहात देखील नेहमीची रेलचेल. यावेळी कविता आलदर ही महिलादेखील बाळासमवेत प्रसूतिगृहात विश्रांती घेत होती. संबंधित बाळंतीणीच्या शेजारी कोणीच नसल्याचे या महिलेने हेरले. पुढे गेली व कविता यांना तुमच्या बाळाला डोस द्यायचा आहे, असे सांगून नवजात बाळाला ताब्यात घेतले. प्लॅननुसार बाळ तर हाती लागले होते. तीन दिवसांपूर्वी सुरू असणारी रेकी कामाला आलेली. ठरल्याप्रमाणे बाळाला तर उचलले होते. पण आता रुग्णालयातून बाहेर कसे पडायचे?
संबंधित महिलेने सोबत आणलेल्या एका बॅगमध्ये बाळाला घातले. ही बॅग तिने प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेली, तसा व्हिडिओ,फोटो आहेत. त्यानंतर थेट सुरक्षा भेदून रुणालयातून पळ काढला. ती बॅग घेऊन बाहेर निघून गेली. बॅगेत बाळ असल्याचा कोणाला संशयही आला नाही. आणि बाळ रडलेही नसावे.
बाळ येऊन जाऊन तासभर लोटला होता. डोस देण्यासाठी नेलेले बाळ अजून न आल्याने आई कविता यांचा जीव कासावीस होता. इतक्यात कविता हिचे नातेवाईकदेखील प्रसूतिगृहात आले. त्यावेळी बाळाला डोस देण्यासाठी नेल्याचे सांगण्यात आले. डोस विभागात जाऊन पाहणी केली असता बाळच नसल्याचे निदर्शनास आले आणि एकच धक्का बसला. मती गुंग झालेली.
झाले! रुग्णालयाला याबाबत कल्पना देण्यात आली. यावेळी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कैमेऱ्यांची तपासणी केली असता संबंधित महिलेने बॅगेतून बाळाला पळवून नेल्याचे दिसले. परंतु रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे दुपारपर्यंत बाळ पळवून नेल्याची पोलिसांना वर्दीच देण्यात आली नव्हती. ही खरे तर फार मोठी चूक होती. पोलिसांना तत्काळ कळवायला पाहिजे होते. युद्धस्तरावर जी गती असते तसा संपर्क करायला पाहिजे होता. त्यामुळे बाळ पळवून नेलेल्या महिलेचा माग काढणे आणखी सुखकर झाले होते. पोलिसांना माहिती मिळेपर्यंत चोर महिलेने धूम ठोकलेली.
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. सीमाभागासह चार ते पाच ठिकाणी छापेमारी केली.परंतू बाळ आणि ती महिला काही पोलिसांच्या हाती लागली नाही, मिरज तालुक्यातील अंकलीपर्यंत महिला गेल्याचे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले. परंतु तेथून पुढे माग काढताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झालेली.
बाळ पळवून नेताना महिलेने अत्यंत शिताफीने हे कृत्य केल्याचे दिसून येते. महिलेने मोबाईलचा वापरच केला नाही. तसेच अंकलीमध्ये एका मेडिकलमधून बाळासाठी दुधाची पावडर आणि दूध बाटलीची खरेदी करतानासुद्धा तिने रोखीनेच व्यवहार करत कोणताही सुगावा पोलिसांसाठी मागे राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. त्यामुळे पोलिसदेखील चक्रावून गेले होते.
सांगली स्थानिक अन्वेषण विभागाची सर्व पथके धडपडत होती, परंतु पोलिसांच्या हाती काहीही लागत नव्हते, मुळात पोलिसांनाच सहा तास विलंबाने कल्पना दिल्याने महिलेला पलायन करायला पुरेपूर वेळ मिळालेला. असे असले तरी पोलिसांनी सुद्धा सर्व यंत्रणा कामाला लावली.
दरम्यान, पीलिसांनी चोर महिला सारा साठे हिचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केला, तसेच ही महिला कुठे मिळून आली, तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे देखील आवाहन केले. पोलिसांनी उलट दिशेने तपास सुरू केला. अपहरण झालेल्या तीन दिवस आधीपासूनचे जिल्हाभरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली. यावेळी सारा ही सावळज बसमधून मिरजेत उतरत असतानाचे सीसीटीव्ही चित्रण समोर आले. त्यानंतर सावळज बसस्थानकातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. सावळजमध्येही संशयित महिला सीसीटीव्हीत चित्रीत झाली होती. त्यामुळे ती याच भागात असल्याची पोलिसांची खात्री झाली.
सोमवारी दुपारी सावळजमधून एका व्यक्तीने संशयित महिला सावळजमध्येच असून तिच्याकडे बाळ असल्याची खात्रीशीर माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना दिली. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांचे एक पथक तत्काळ सावळजकडे रवाना झाले. तिला पोलिसी खाक्या दाखवून तिने बाळ चोरल्याची कबुली दिली. बाळाची प्रकृती चांगली असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिल्यानंतर प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी अपह्रत अर्भक आईकडे सुपूर्द केले. बाळ आईच्या कुशीत विसावले.