

मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातून (मिरज सिव्हिल) अर्भकाचे अपहरण करणार्या सारा सायबा साठे (वय 24, सध्या रा. सावळज, ता. तासगाव, मूळ रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) हिला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, आठ तारखेपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. अर्भकाची डीएनएची चाचणी करण्यात येणार आहे. याप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आज, बुधवारी मिळण्याची शक्यता आहे.
या रुग्णालयातून अर्भकाच्या अपहरणाचा 57 तासांत मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी छडा लावला. तासगाव तालुक्यातील सावळज येथून सारा साठे या महिलेस अटक केली. तिच्या पतीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. सारा हिला मंगळवारी न्यायालयात हजर केले, यावेळी तिने बाळाचे अपहरण नेमके कोणत्या कारणातून केले? त्यामागे तिचा नेमका उद्देश काय होता? तिला या प्रकरणात कोण-कोण सहकार्य करत होते? याचा तपास करायचा आहे, त्यामुळे तिला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली. यानुसार न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तिच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.दरम्यान, अपहरण झालेल्या अर्भकाची डीएनए चाचणी करण्याची शिफारस केल्यामुळे त्याची डीएनए चाचणी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. डीएनए चाचणी कधी होणार, याबाबत मात्र गोपनीयता बाळगली आहे. तसेच, शासकीय रुग्णालयातून अर्भकाचे अपहरण झाल्याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली होती.
सारा हिला अटक केल्यानंतर तिच्यासोबत सायबा याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याला माध्यम प्रतिनिधींनी अर्भकाबाबत विचारले असता त्याने, ‘बाळ माझेच आहे’, असा कांगावा केला. त्यामुळे सारा हिने बाळाचे अपहरण करून चोरी केल्याची माहिती सायबा याला होती की नाही? की सायबाकडून कांगावा केला जात आहे, असाही प्रश्न उपस्थित होतो.
सारा हिचा पती सायबा याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात त्याचा काही संबंध आहे का? अपहरणासाठी सायबा याने सारा हिला मदत केली आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे.