

Atpadi Marriage Fraud Case
आटपाडी : लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून दोन कुटुंबांची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात उघडकीस आला आहे. सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत आरोपींनी विश्वास संपादन केला आणि नंतर पोबारा केला. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनाजी शिवाजी कदम (वय ६०, शेती व्यवसाय, रा. कौठुळी, ता. आटपाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. १८ ते २० मार्च २०२५ दरम्यान कौठुळी, दिघंची तसेच शितलादेवी मंदिर, बारड (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथे हा फसवणुकीचा प्रकार घडला.
धनाजी भिमराव शिंदे (रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहाकाळ) व पोलु शंकर गिरी (रा. शेनीदेळुप, ता. अर्धापुर, जि. नांदेड) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलासाठी योग्य मुलगी शोधून लग्न लावून देतो, असे सांगितले. पोलु गिरीच्या मदतीने ‘आरती’ नावाच्या तरुणीला शितलादेवी मंदिर, बारड येथे आणण्यात आले. तेथे सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत फिर्यादीकडून २ लाख ५० हजार रुपये रोख घेतले.
मात्र, लग्न होण्यापूर्वीच ही तरुणी दिघंची येथून अचानक निघून गेली. संशय बळावल्यानंतर चौकशी केली असता, हाच प्रकार फिर्यादीचे पाहुणे दत्तात्रय सुभाष काशीद यांच्याबाबतही झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी त्यांच्याकडूनही लग्न लावल्याचा भास निर्माण करून २ लाख ५० हजार रुपये उकळले होते. मात्र संबंधित मुलगी अवघ्या ३० ते ४० दिवसांतच सासर सोडून पसार झाली.
आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच धनाजी कदम यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. चौकशीअंती व उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा यांच्या लेखी परवानगीने दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात एकूण पाच लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आरोपींच्या शोधासाठी आटपाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.