

Dighanchi youth attacked
आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) येथे जुन्या वादाच्या रागातून एका तरुणावर चारचाकी वाहनाने धडक देऊन कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न तसेच भारतीय हत्यार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत साहिल सलमान खान (वय २२, व्यवसाय सेंट्रींग काम, रा. यमाईनगर, दिघंची) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १४) रात्री सुमारे ९ वाजता साहिल खान व त्यांचा मित्र प्रविण अंकुश मोरे हे मोटारसायकल (एमएच-१२-युके-३८७३) वरून दिघंची एस.टी. स्टँड येथून घरी जात असताना दिघंची–झरे रोडवरील संगम कार्यालयाजवळ हा प्रकार घडला.
आरोपी नईम अमीर तांबोळी, प्रथमेश आण्णा चव्हाण व प्रशांत मोरे (सर्व रा. दिघंची) यांनी संगनमत करून चारचाकी वाहनातून पाठीमागून येत मोटारसायकलला जोराची धडक दिली. धडकेनंतर आरोपी वाहनातून उतरले व कोयत्याने साहिल खान यांच्या डोक्यावर तसेच उजव्या हातावर वार करत “तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीच्या जबाबात नमूद आहे.
दोन दिवसांपूर्वी तेजस रणदिवे व अविनाश लोखंडे यांच्यात झालेल्या भांडणात फिर्यादीने तेजसची बाजू घेतल्याचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपींनी प्रविण मोरे यांच्या अंगावरही वाहन घालून त्यांना जखमी केले तसेच मोटारसायकलचेही मोठे नुकसान केले.
जखमींवर वरद हॉस्पिटल, आटपाडी येथे उपचार सुरू असून, उपचारादरम्यान फिर्यादीचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून आतापर्यंत एक साक्षीदार तपासण्यात आला आहे.