

मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार झाले. इलाही हबीब इनामदार आणि संजय रघुनाथ कदम (दोघे रा. हनुमाननगर, एरंडोली, ता. मिरज) अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.
अपघातात मृत्यू झालेले दोघे शनिवारचा आठवडा बाजार करून दुचाकीवरून घरी परतत होते. शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ते एरंडोली येथील हनुमान हॉटेलजवळ आले असता, त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. यामध्ये इलाही इनामदार हे जागीच ठार झाले, तर संजय कदम गंभीर जखमी झाले. कदम यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेले जात होते. परंतु रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित वाहनाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.