शहरातील जामवाडी परिसरात भरदिवसा अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय 21) या कबड्डीपटू तरुणाच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले. त्यातील चारजण अल्पवयीन आहेत. मुख्य संशयितांच्या नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय व वाढदिवसादिवशी झालेल्या भांडणाच्या रागातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले.
मुख्य सूत्रधार मंगेश ऊर्फ अवधूत संजय आरते (वय 27, रा. मरगुबाई मंदिरानजीक, जामवाडी) आणि जय राजू कलाल (18 वर्षे 5 महिने, रा. उदय मटण शॉपनजीक, पटेल चौक, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना सात दिवसांची कोठडी सुनावली. चार संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले. मृत अनिकेत व मुख्य सूत्रधार मंगेश दोघेही जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळील गल्लीतले. त्यांच्यात वर्षभरापासून वाद धुमसत होता. मंगेशच्या नात्यातील तरुणीशी अनिकेतचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. तसेच 23 ऑक्टोबर 2023 रोजी मंगेशच्या वाढदिवसादिवशी अनिकेतशी वाद झाला, पण तो वाद मिटविला. पोलिस ठाण्यापर्यंत मारामारीचे प्रकरण आले नव्हते. महिलेची छेडछाड, व्याजाच्या पैशावरूनही संशयित व अनिकेतमध्ये वाद होता. त्यामुळे मंगेशने अनिकेतचा काटा काढण्याचा कट रचला होता.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या अनिकेत जीमसाठी निघाला असता मरगुबाई मंदिराच्या दारात पाच संशयितांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. सपासप वार करीत त्याचा खून केला. हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले होते. शहर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने संशयितांच्या अटकेसाठी पथके रवाना केली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना संशयित कृष्णा नदीकाठ परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. रात्री नदीकाठी पोलिसांनी शोधमोहिम राबविली. पोलिसांना पाहता संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन सर्वांना जेरबंद केले. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर गोडे, उपनिरिक्षक केशव रणदिवे, महादेव पोवार, प्रमोद खाडे, विनायक शिंदे, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संदिप कुंभार, योगेश सटाले आदींनी भाग घेतला होता.
खूनातील जय राजू कलाल याला ताब्यात घेतल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचे सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची बालसुधारगृहात रवानगी केली होती. पण त्याचे आधारकार्ड पोलिसांच्या हाती लागले. आधारकार्डावरून त्याचे वय 18 वर्षे 5 महिने असल्याचे सिद्ध होताच पोलिसांनी सुधारगृहातून त्याला ताब्यात घेत अटक केली.
अनिकेतवर जय कलालसह पाच जणांनी कोयत्याने हल्ला केला. त्याच्या डोक्यात दोन, पाठीवर, डोळ्यांवर, कंबरेवर वार करण्यात आले. हे घाव इतके वर्मी होते की, दोन्ही कोयते त्याच्या डोक्यात अडकले होते. त्यातील एक कोयता शवविच्छेदनावेळी कटरच्या सहाय्याने कापून काढावा लागला. पाच संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मंगेश आरते याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली.