

मिरज : स्वप्निल पाटील
दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसची गुरुवारी मिरजपर्यंत ट्रायल रन यशस्वी पार पडली. नियोजित वेळेच्या एक तास अगोदरच वंदे भारत एक्स्प्रेस मिरजेत पोहोचली होती, तर शनिवारी (दि. 14) मिरज-पुणे-मिरज वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात येणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेकडून हुबळी-मिरज-पुणे अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. या एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली. एक्स्प्रेस हुबळी येथून सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी सुटली. बेळगावमध्ये 12 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली. तसेच मिरजमध्ये 2 वाजून 05 मिनिटांनी एक्स्प्रेसचे आगमन झाले. त्यानंतर 2 वाजून 20 मिनिटांनी एक्स्प्रेस मिरजेतून हुबळीकडे पुन्हा रवाना करण्यात आली. हुबळी विभागाच्या व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखाली ट्रायल रन घेण्यात आली.
हुबळी-मिरज-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस हुबळी-मिरज-कोल्हापूर-मिरज-पुणे अशी सोडण्यात आली होती. त्यानंतर पुण्यातून ही एक्स्प्रेस मिरजमार्गे थेट हुबळीला जाणार होती. त्यामुळे कोल्हापूरमधील प्रवाशांना एकाच मार्गे प्रवास करावा लागणार होता. तसेच हुबळी, धारवाड आणि बेळगावमधील प्रवाशांच्या प्रवासी वेळेत विनाकारण दोन तास वाढणार होते. त्यामुळे त्यात बदल करून एक्स्प्रेस तीन दिवस हुबळी-मिरज-पुणे आणि तीन दिवस कोल्हापूर-मिरज-पुणे अशी सोडावी, अशी मागणी मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी केली होती. त्याला रेल्वेकडून मंजुरी देण्यात आली आहे. आठवड्यातून तीन दिवस वंदे भारत एक्स्प्रेस हुबळी ते पुणे आणि तीन दिवस कोल्हापूर ते पुणे अशी धावणार आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील प्रवाशांना वंदे भारत एक्स्प्रेसचा लाभ होणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसला सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर थांबा देण्यात आला नाही, अशी अफवा समाजमाध्यमांवर काहीजणांनी पसरवली होती; परंतु कोल्हापूर-मिरज-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा स्थानकांवरदेखील थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे याबाबतच्या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हुबळी-मिरज-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस बारगळली, अशी चर्चा सुरू झाली होती; परंतु सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील आमदार आणि खासदारांनी मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोडण्याची मागणी मध्य रेल्वेकडे केली आहे. त्याला मध्य रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच मुंबई-कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसदेखील धावणार आहे.
मिरज ते हुबळी रेल्वेमार्गावर सर्व एक्स्प्रेस आणि मेल एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांना 90 कि.मी. प्रतितास वेगाची मर्यादा आहे; परंतु प्रत्यक्षात रेल्वे गाड्या 75 ते 85 किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असतात. वंदे भारत एक्स्प्रेस मात्र 110 कि.मी. वेगाने धावली. त्यामुळे सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी हुबळीमधून सुटलेली वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी 3 वाजता मिरजेत पोहोचण्याऐवजी एक तास अगोदर 2 वाजून 05 मिनिटांनी पोहोचली. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत एक तासाची बचत होणार आहे.