

कोल्हापूर : कोल्हापूर-पुणे मार्गावर स्वतंत्र ‘वंदे भारत’ आठवड्यातून तीन दिवस धावण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकात ही गाडी कोल्हापूर ते पुणे या मार्गावर दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावेल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, याच दिवशी हुबळी-पुणे ‘वंदे भारत’चेही तेच वेळापत्रक दिले आहे. यामुळे हुबळी-पुणे हीच गाडी कोल्हापुरात येऊन जाणार की कोल्हापूर-पुणे मार्गासाठी स्वतंत्र ‘वंदे भारत’ धावणार याचा संभ्रम कायम आहे.
गुरुवार वगळता सहा दिवस हुबळी-पुणे ‘वंदे भारत’ धावणार आहेत. त्यापैकी तीन दिवस ही गाडी मिरजहून कोल्हापूरला येईल आणि कोल्हापुरातून पुन्हा मिरज आणि पुढे पुण्याला जाईल. तसेच पुण्यावरून येताना मिरजेतून कोल्हापूरला येईल, कोल्हापुरातून पुन्हा मिरजला जाऊन पुढे हुबळीला रवाना होईल, असे सांगण्यात आले होते. बुधवारी मात्र, रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकात दोन्ही गाड्यांचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे कोल्हापूर-पुणे मार्गावर स्वतंत्र ‘वंदे भारत’ सुरू होईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, ‘वंदे भारत’ सुरू होणार असल्याने रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी गुरुवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी करणार आहेत.
कोल्हापूर-पुणे
गाडी धावणार : बुधवार, शुक्रवार आणि रविवार
कोल्हापुरातून सुटणार : सकाळी 8.15 वाजता
मिरजेत पोहोचणार : सकाळी 9 वाजता
पुण्यात पोहोचणार : दुपारी 1 वाजून 30 मिनिटे
गाडीचा वेग : 62.09 प्रतितास किलोमीटर
प्रवासासाठी लागणारा कालावधी : 5 तास 15 मिनिटे
पुणे-कोल्हापूर
गाडी धावणार : बुधवार, शुक्रवार आणि रविवार
पुण्यातून सुटणार : दुपारी 2.15 वाजता
मिरजेत पोहोचणार : सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटे
कोल्हापुरात पोहोचणार : सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटे
गाडीचा वेग : 60.25 प्रतितास किलोमीटर
प्रवासासाठी लागणारा कालावधी : 5 तास 25 मिनिटे