

सांगली : दुधगाव येथे जुन्या पत्र्याच्या वादातून दोन तरुणांनी एकाला कुदळ, वीट आणि कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी केले. ही घटना दि. 25 रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली. विष्णू ज्ञानदेव मोरे (वय 42) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शंभू बाजीराव मोरे व त्याचा मित्र यादव (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी मोरे यांनी त्यांच्या घरावरील जुना पत्रा उतरवून समोरील रस्त्यावर ठेवला होता. त्यावरून वाद होऊन शंभू मोरे व त्याचा मित्र यादव यांनी त्यांना शिवीगाळ केली. वाद विकोपाला जाताच शंभू मोरे याने रस्त्यावर पडलेली वीट उचलून विष्णू यांच्या उजव्या मनगटावर जोरदार फेकली. त्यानंतर खाली पडलेल्या विष्णू यांच्यावर जवळच पडलेली कुदळ उचलून डाव्या बरगडीत मारली.
इतक्यावरच न थांबता त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस व उजव्या डोळ्याच्या वरतीही मारहाण करत गंभीर जखमी केले. तसेच साथीदार यादव याने हातात कोयता घेत, तुला सोडत नाही, अशी धमकी देत दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.