

विटा : येथील तहसील कार्यालयातील ३० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन मृत्यू पश्चात अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. यामुळे समाजात अवयवदानाबाबत जागरूकतेला मोठा हातभार लागेल असा विश्वास तहसीलदार योगेश टोंपे यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात अवयवदान मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आदी ठिकाणी अवयवदानाची माहिती पोहोचवली जात आहे. अवयवदान हे अत्यंत पवित्र आणि मानवतेचे दान मानले जाते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे, मूत्रपिंड, हृदय, यकृत, फुफ्फुसे, त्वचा इत्यादी अवयव गरजूंना दिले जाऊ शकतात.
एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे किमान आठ व्यक्तींना नवजीवन मिळू शकते. अनेक रुग्ण गंभीर आजारांमुळे किंवा अपघातामुळे आपले अवयव गमावतात. अशावेळी अवयवदान हा एकमेव पर्याय असतो. त्यामुळे अवयवदानामुळे केवळ एखाद्याचे जीवन वाचतेच असे नाही तर त्या कुटुंबालाही आधार मिळतो. नायब तहसीलदार अभिजित हजारे आणि डॉ. विजय साळुंखे यांनी प्रथम अवयवदानाची नोंदणी केली आणि इतरांना प्रेरित केले.
या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण ३० तलाठी , मंडळ अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांनी अवयवदानाची नोंदणी केली. याबाबत तहसीलदार योगेश टोंपे म्हणाले, या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी व्हावे यासाठी तहसील कार्यालयात अवयव दानासाठी क्यु आर कोड आणि लिंकसह माहितीफलक लावण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना जागेवरच नोंदणी करता येणार आहे. नागरिकांनी पुढे येऊन अवयवदान करून गरजूंचे प्राण वाचवावेत, असे आवाहनही तहसीलदार टोंपे यांनी केले आहे.