सांगली- विट्यात डॉ. पतंगराव कदम यांचे स्मारक व्हावे : अॕड. मुळीक
विटा : पुढारी वृत्तसेवा – विटा शहर ही डॉ. पतंगराव कदम यांची कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत डॉ. कदम यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी मागणी विटा तालुका नगर वाचनालयाचे कार्यवाह अॕड. बाबासाहेब मुळीक यांनी केली. विटा नगर वाचनालयात कै. डॉ.पतंगराव कदम यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित केली होती. यावेळी अॕड. मुळीक बोलत होते. याप्रसंगी रवींद्र भिंगारदेवे, अॕड.संदीप मुळीक, डी.के. कदम, नंदकुमार पाटील, आनंदराव पाटील, किसनराव जानकर, विठ्ठलराव साळुंखे, सचिन शितोळे, उत्तमराव चोथे, विनय भंडारे प्रमुख उपस्थित होते.
अॕड. मुळीक म्हणाले, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या ताकारी, आरफळ, टेंभू, म्हैसाळ या योजनांसाठी भरीव योगदान देवून दुष्काळाचा कलंक पुसण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या कै. डॉ. पतंगराव कदम यांचे स्मारक विट्यात व्हावे, असे अनेकांची मागणी आहे.
डॉ. कदम हे सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संचालक होते. त्यावेळी विट्यात बसस्थानक, डेपो, वर्कशॉप वगैरे काही नव्हते. त्यांनी बसस्थानकाच्या जागेसाठी पाठपुरावा करून इथे नवीन एसटी स्टँड, एसटी डेपो आणि वर्कशॉपची उभारणी केली. या का ळात त्यांनी अनेक तरुणांना एसटी महामंडळ आणि भारती विद्यापीठात नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. तसेच सोनहिरा साखर कारखा ना, सूतगिरणी यांची स्थापना करून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी खानापूर तालुक्यात उदगिरी शुगर हा साखर कारखाना उभा केला. त्यामुळे खानापूर तालुक्यातील पूर्व आणि दक्षिण भागातील शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने डॉ. कदम यांनी दुष्काळी भागात ठिकठिकाणी चारा छावण्या, चारा डेपो उभा केले, शेतमजुरांसाठी रोजगार हमीची कामे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सुविधा केली. अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान तसेच पाऊस न पडल्यामुळे म्हणजे अवर्षणामुळे पेरणी झाली नाही. अशावेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दुष्काळाची तीव्रता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाणवू दिली नाही, असेही अॕड. मुळीक यांनी सांगितले.
अशोकराव सुतार म्हणाले, डॉ. कदम विट्यात आल्यापासून त्यांचे आमच्या घराशी कौटुंबिक संबंध होते. डॉ.कदम हे अत्यंत दिलदार स्वभावा चे होते. एसटी महामंडळात त्यांनी अनेकांना सहज नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. डॉ. कदम यांची कन्या भारती यांचा जन्म आमच्या घरीच झाला. डॉ. कदम हे अजातशत्रू होते. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना सुतार हे भावूक झाले.
रविंद्र भिंगारदेवे म्हणाले, अत्यंत गरीब कुटुंबात जन्म होऊनही आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सहकार व राजकारणात मोठी प्रगती केली. पालकमंत्री असताना डॉ. कदम यांनी टेंभू योजनेला निधी मिळविण्यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. टेंभू योजने च्या पूर्णत्वात डॉ. कदम यांचे मोलाचे योगदान आहे.
यावेळी सुरेश पाटील म्हणाले, सामान्य कुटुंबातून येऊन डॉ. कदम यांनी खूप मोठी प्रगती केली. साहेब या उपाधीची उंची डॉ. कदम यांच्या कार्यातून दिसून येते. दूरदृष्टी ठेवून कामाचे नियोजन करणे आणि झोकून देऊन ती योजना राबवणे हे त्यांच्या यशाचे गमक म्हणावे लागेल. अॕड.महेश शानभाग यांनी आभार मानताना डॉ. कदम यांची आठवण सांगितली. ते म्हणाले, आज सांगलीत विजयनगर येथे जिल्हा न्यायालयाच्या इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. परंतु ज्यावेळी ही कृषी खात्याची जमीन हस्तांतरित करण्याचे ठरले होते. परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याने ही जागा हस्तांतरित होण्यास विलंब लागत होता. त्यावेळी महसूल मंत्री असलेल्या डॉ. कदम यांनी महसूल मंत्र्यांच्या तोंडी आदेशाने फेरफार धरा व तातडीने कामाला सुरुवात करा, असे आदेश दिले. इतक्या धडाडीने काम करणारे नेते राजकारणात फार कमी आहेत.
यावेळी विक्रम लकडे, बाळकृष्ण देशमुख, गजानन सुतार, बाळासाहेब पाटील, अॕड. वैभव माने, हणमंतरा व सपकाळ, बाळकृष्ण यादव, जे. एच. पाटील, भीमसेन कुरकुटे, निवास घोडके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन विक्रम चोथे, संभाजी मोरे यांनी केले.

