Vita Highway Issues | दौंड–संकेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणावरून सत्ताधाऱ्यांतच सवतासुभा; विट्यात दोन स्वतंत्र बैठका
Daund Sankeshwar National Highway
विजय लाळे
विटा : दौंड–संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या विटा शहरातील रुंदीकरणाच्या प्रश्नावरून शनिवारी (दि.७) राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्येच सवतासुभा मांडल्याचे चित्र दिसून आले. महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडत सत्ताधारी व विरोधी गटांनी स्वतंत्र बैठका घेतल्याने विट्यात राजकीय वातावरण तापले.
माहुली ते म्हैसाळ हा संपूर्ण मार्ग चार पदरी करावा, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी केली. मात्र विटा शहरातील रस्त्याची रुंदी कमी करण्याबाबत विटा नगरपालिकेने कोणतेही पत्र दिलेले नसल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागातील सचिव श्रुती नाईक आणि संतोष शेळके यांनी दिले.
दरम्यान, शहरातून जाणाऱ्या महामार्गामुळे कोणत्याही मालमत्तेला धक्का लागू नये, याची काळजी घेऊनच काम करावे, अशी सर्वपक्षीय मागणी असल्याचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी सांगितले. या चर्चेदरम्यान खासदार विशाल पाटीलही उपस्थित होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून विटा नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये या विषयावरून वाद सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज एकाच दिवशी महामार्ग रुंदीकरणाच्या मुद्द्यावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडल्या.
पालिकेत आमदार सुहास बाबर, नगराध्यक्ष काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी महामार्ग अधिकाऱ्यांची वाट पाहत होते. त्याचवेळी महसूल भवनातील सभागृहात भाजप नेते वैभव पाटील, नागरी हक्क संघटनेचे सुनील सुतार, राष्ट्रवादीचे विवेक भिंगारदेवे आणि कार्यकर्ते स्वतंत्र बैठकीसाठी उपस्थित होते. महामार्ग अधिकाऱ्यांनी प्रथम भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने पालिकेतील बैठकीसाठी जमलेल्या लोकप्रतिनिधींना सुमारे तासभर प्रतीक्षा करावी लागली.
खासदार विशाल पाटील यांनी मात्र दोन्ही बैठकींना उपस्थित राहून या प्रश्नावर समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विटा शहर विकास आराखड्यानुसार रस्त्याची रुंदी ३० मीटर असताना ती कमी करून २१ मीटर करू नये, अशी मागणी करण्यात आली. जर महामार्ग प्राधिकरणाने वेगळा निर्णय घेतला, तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून काम रोखू, असा इशारा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिला. शहरातील मालमत्तांना धक्का न लावता जिथे शक्य आहे तिथे जास्त आणि जिथे कमी आहे तिथे कमी रुंदी ठेवावी, अशीही भूमिका त्यांनी मांडली.
पालिकेतील बैठकीत आमदार सुहास बाबर यांनी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना प्रतीक्षा करायला लावणे योग्य नसल्याची नाराजी व्यक्त केली. “महिला दिन जवळ आला आहे. अधिकारी महिला असल्याने त्यांचा आदर राखत आम्ही शांत आहोत,” असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की, माहुली ते म्हैसाळ हा संपूर्ण मार्ग चार पदरी करण्याची आमची मागणी आहे. मात्र रस्ता करताना कोणत्याही नागरिकाच्या मालमत्तेला धक्का लागू नये, ही सर्वांची भूमिका आहे. रस्त्याला २०२४ मध्ये तांत्रिक मान्यता मिळाली असून त्यावेळीच रुंदी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता ती बदलणे शक्य नाही आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निकषांनुसारच काम होईल. तसेच विट्यात स्वागत कमानीपासून चार पदरी रस्ता करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
बैठकीनंतर स्थळ पाहणीदरम्यान दोन्ही गटांचे पदाधिकारी आमनेसामने आले. वाद वाढल्याने या प्रश्नावर ठोस तोडगा निघू शकला नाही.
बारामती, धनुष्यबाण आणि विशालदादा
पालिकेतील बैठकीनंतर खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर आणि उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी काही नगरसेवक, पदाधिकारी व नागरिकांसह महामार्गाच्या कामाची पाहणी केली.
यावेळी खासदार पाटील यांनी हा रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा झाल्याचे सांगितले. बारामती ते संकेश्वर हा मार्ग “बाण मारल्यासारखा सरळ” धरल्याचे त्यांनी उपस्थितांना बोली भाषेत स्पष्ट केले.
त्यावर आमदार सुहास बाबर यांनी “म्हणजे विशालदादांनी धनुष्यबाण हातात घेतल्याशिवाय ते शक्य नाही,” अशी हलकीफुलकी कोटी केली. या विनोदी टिप्पणीमुळे काही काळ गंभीर वातावरणातही उपस्थितांमध्ये हास्याची लहर पसरली.

