

विटा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 च्या रुंदीकरणावरून विटा शहरात आज मोठा उद्रेक पाहायला मिळाला. ‘हा रस्ता महामार्ग न राहता लघुमार्ग का झाला?’ या आंदोलकांच्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांची अक्षरशः भंबेरी उडाली. अखेरीस, उपस्थित अधिकाऱ्यांनी रस्ते कमी करण्याच्या निर्णयाचे खापर अनुपस्थित मुख्याधिकाऱ्यांवर फोडून तेथून काढता पाय घेतला.
विटा शहरातून जाणाऱ्या पूर्वीच्या राज्य मार्ग 10 ची राष्ट्रीय महामार्ग 160 अशी दर्जोन्नती करण्यात आली आहे. नियमानुसार या महामार्गाची रुंदी 30 मीटर असणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ती 21 मीटरपर्यंत (काही ठिकाणी त्याहूनही कमी) मर्यादित ठेवण्याचा घाट घातला जात आहे. मुख्य बाजारपेठ आणि रहिवासी भागात रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी दुप्पट होण्याची भीती व्यक्त होत आहे. महामार्गाच्या कडेला सुरू असलेल्या गटारीच्या कामात कमालीची त्रुटी असल्याचे लक्षात येताच, भाजपा नेते व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विटेकर रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी संतोष शेळके आणि त्यांच्या पथकाला धारेवर धरले.
वैभव पाटील म्हणाले, पूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी 30 मीटर रुंदीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. आता प्रत्यक्षात 6 ते 8 फूट आत खोदाई करून रस्ता अरुंद केला जात आहे. काही धनदांडग्यांच्या इमारती वाचवण्यासाठी संपूर्ण शहराचे विद्रुपीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या कारनाम्यामागचा नेमका ‘आका’ कोण? असा जाब विचारत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात विरोधी पक्षनेते अजित गायकवाड, सुमित गायकवाड, सुनील सुतार, विवेक भिंगारदेवे, किरण तारळेकर, प्रशांत राठोड, सचिन शितोळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.