

Sangli school sports news
सांगली : जिल्हास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा डफळापूर नंबर २ च्या संघाने अत्यंत चिवट आणि चित्तथरारक खेळ करत बलाढ्य मिरज संघावर विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयात डफळापूरची कर्णधार श्रावणी गडदे हिने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या खेळाचे कौतुक करताना "श्रावणी एक उत्कृष्ट खेळाडू घडू शकते," असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले.
शनिवारी (दि. १७) पार पडलेल्या या सामन्याची नाणेफेक मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते झाली. शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनीही दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि सामन्याला सुरुवात झाली. सुरुवातीला मिरज संघाचे पारडे जड दिसत होते आणि मिरजच्या विजयाचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, डफळापूरच्या मुलींनी हार न मानता अत्यंत धैर्याने आणि संयमाने खेळ केला. कर्णधार श्रावणी गडदेच्या आक्रमक चढाया आणि संघाने केलेल्या मजबूत पकडीमुळे सामन्याचे चित्र पालटले आणि डफळापूरने विजयावर शिक्कामोर्तब केले.
खेळाडूंचे आत्मबल वाढवण्यासाठी जतचे गटशिक्षणाधिकारी राम फरकांडे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी जवळपास एक तास मुलींचा 'मनाचा व्यायाम' (मानसशास्त्रीय समुपदेशन) घेतला. शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख यांनीही खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
या स्पर्धेसाठी जि.प. शाळा डफळापूर नंबर २ चे मुख्याध्यापक आर. आर. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ता पाटील, प्रतिभा साळुंखे, सुषमा चव्हाण, रेणुका फुले, अजय डोंगरे, अक्षय कांबळे आणि अलका पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या विजयानंतर डफळापूर शाळा आणि खेळाडूंवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.