

सांगली : सांगली महानगरपालिकेत बहुमतासाठी भाजपला एक जागा कमी पडली आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेशी चर्चा सुरू केली आहे. मात्र महापालिकेतील सत्ता निर्धोक करण्यासाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी महायुती होईल, तसेच या तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करून निर्णय घेतील, असे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस व समविचारी पक्षांची चर्चा सुरू आहे, असा दावा काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा सस्पेन्स वाढला आहे. महापालिकेच्या 78 जागांसाठी निवडणूक झाली. मात्र कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपने सर्वाधिक 39 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 40 जागांची गरज आहे. काँग्रेसला 18, राष्ट्रवादीला 16, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला 3, तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे बहुमत एका जागेने हुकले आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना गती आली आहे.
शुक्रवारी मतमोजणीदिवशी दुपारनंतर भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नेते आ. सुहास बाबर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभुराज देसाई यांच्यात चर्चा होऊन निर्णय होईल, असे सांगितले जात आहे.
महापालिकेत भाजप-शिवसेना युती झाली तरी, हे बहुमत अगदी काठावरचे राहणार आहे. महापालिकेत स्थायी समितीला महत्त्व आहे. या स्थायी समितीतही बहुमत महत्त्वाचे आहे. त्यामुळे काठावरच्या बहुमताऐवजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीलाही महापालिकेच्या सत्तेत सोबत घेण्याचा निर्णय भाजपचे नेते घेतील, तशी चर्चा वरिष्ठस्तरावर होईल, असे संकेत मिळत आहेत.
यावेळी आमदार डॉ. कदम म्हणाले, महापालिका निवडणुकीत भाजप 55 प्लस जागा जिंकणार असल्याचे दावे करत होता. मात्र भाजपला बहुमतही मिळाले नाही. मतदारांनी भाजपला धक्का दिला आहे. भाजप 50 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकलेला नाही. महापालिकेत काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून अन्य समविचारी पक्षांचे नगरसेवकही निवडून आले आहेत. त्यांच्या संपर्कात आहोत. सत्तास्थापनेबाबत प्रस्ताव आले असून चर्चा सुरू आहे. मी आणि खासदार विशाल पाटील यांच्यात याबाबत चर्चा होणार आहे. ज्या-ज्या पक्षांच्या नावात काँग्रेस हा शब्द आहे, ते सर्व पक्ष आमच्या संपर्कात आहेत. महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे.
दरम्यान, एकीकडे भाजप महायुतीचे संकेत देत असताना, दुसरीकडे काँग्रेसनेही समविचारी पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे सांगून सत्तास्थापनेचा सस्पेन्स वाढवला आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या मिरज दौऱ्याकडे लक्ष
काँग्रेसनेही सत्तास्थापनेच्या शर्यतीत सहभाग घेतल्याने राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवार, दिनांक 18 रोजी मिरजेत येणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा ग्रामीण कोअर कमिटीची बैठक, तसेच महायुतीतील घटकपक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा होणार आहे. या बैठकीत महापालिकेच्या सत्तास्थापनेवरही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापौर पदाची आरक्षण सोडत लवकरच
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या 2008 ते 13, 2013 ते 18, तसेच 2018 ते 23 या कालावधीत महापौर पद कोण-कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, याची माहिती तसेच अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाची लोकसंख्या व या प्रवर्गांसाठी आरक्षित सदस्यसंख्या याची माहिती नगरविकास विभागाला यापूर्वीच सादर केलेली आहे. चार दिवसात आरक्षण सोडत निघेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीनंतर महापौर पदाच्या अडीच वर्षांच्या पहिल्या टर्मसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण पडले होते. अडीच वर्षांच्या दुसऱ्या टर्मसाठी महापौर पद खुले राहिले होते. आता महापौर पद आरक्षित होईल, अशी चर्चा आहे.