सांगली ः पुढारी वृत्तसेवा
शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा मागे घेण्याची धमकी देत दोघांवर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना विश्रामबाग परिसरातील नालंदा वाचनालयाजवळ बुधवारी दुपारी घडली. प्रदीप तानाजी निकम (वय 35, रा. कोल्हापूर रोड, अंकली) व त्यांचे मित्र राहुल तुकाराम दुधाळ असे जखमींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे..
सूरज चोपडे (वय 32), आकाश मोहिते (23), केदार खडके (30), अजय घाडगे (28), समीर ढोले (19), रोहित उगारे (20) व कार्तिक गायकवाड (22, सर्व, रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रदीप निकम यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात कोयत्याने हल्ला करणार्या सराईत गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. संजयनगर, विश्रामबाग परिसरात या गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली आहे. बुधवार, दि.4 रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी प्रदीप निकम व त्यांचा मित्र राहुल दुधाळ नालंदा वाचनालयाजवळ थांबले होते. यावेळी सचिन चोपडेसह सातजण तिथे आले.
निकम हे शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील साक्षीदार आहेत. चोपडे याने पोलिसांत दाखल तक्रार मागे घे. त्यामध्ये साक्ष देऊ नको, असे म्हणत निकम व दुधाळ या दोघांना दमदाटी केली. त्यातून दोघांत वादावादी झाली. चोपडे यांनी जिवंत सोडणार नाही, असे म्हणत धारदार कोयत्याने निकम यांच्या डोक्यात वार केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर केदार खडके यांनी कोयत्याने दुधाळ यांच्या पायावर वार केला.
या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले. त्यानंतर हल्लेखारांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हल्ल्यानंतर सर्वांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केली. पोलिसांनी पाच हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.