सांगली, पुढारी वृत्तसेवा : सांगली शहरातुन एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर येथे आज (दि.७) महाविद्यालयीन युवतीवर धारदार हत्याराने खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी युवतीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान हल्लेखोराने पलायन केले आहे.
माहितीनुसार सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर येथे महाविद्यालयीन युवतीवर धारदार हत्याराने आज(दि.७) खुनी हल्ला झाला आहे. हल्लेखोर हा संबंधित युवतीचा पती असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. परंतु त्यांच्यामध्ये सातत्याने वाद होत होते.
आज संबंधित युवती महाविद्यालयात जात असताना हल्लेखोर पतीने तिला गाठले व महाविद्यालयासमोरच सोबत आणलेल्या धारदार हत्याराने तिच्यावर हल्ला केला. परंतु हल्ला चुकविण्यासाठी युवतीने हात मध्ये घातल्याने तिच्या हातावर वर्मी घाव बसला. खुनी हल्ला करताच हल्लेखोर पतीने मात्र घटनास्थळावरून पलायन केले. जखमी झालेल्या युवतीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.