सांगली : पुढारी वृत्तसेवा
जुनी धामणी (ता. मिरज) येथे क्रिकेट खेळताना झालेल्या वादावादीतून सचिन रणजित कोळी आणि सुनील रणजित कोळी या भावांवर शुक्रवारी रात्री तिघांनी खुनी हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी राहुल सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी आणि योगेश कोळी (तिघे रा. जुनी धामणी) या तिघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सचिन कोळी, सुनील कोळी व तिघे संशयित शुक्रवारी क्रिकेट खेळत होते. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. त्याचे पर्यावसान भांडणात झाले. त्यानंतर सर्वजण निघून गेले होते.
परंतु क्रिकेट खेळताना झालेल्या वादावादीचा राग मनात धरून तिघांनी रात्री पुन्हा सचिन व सुनील कोळी यांना गाठले. त्यांच्यासोबत पुन्हा वादावादी सुरू केली. दगड व विळ्यासारख्या धारधार हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये सचिन व सुनील कोळी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी शनिवारी तिघांना अटक केली. तिघांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.