

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आ. जयंत पाटील यांची अवस्था ‘नटसम्राट’मधील बेलवलकर यांच्यासारखी झाली आहे. ‘कोणी घर देता घर’, असे ते म्हणत होते. हे जयंत पाटील आता ‘कोणी पक्षात घेता का पक्षात, अशी आर्जवं करत आहेत.’ जयंतरावांची अवस्था त्यांच्या पक्षात लिंबू-टिंबूसारखी झाली आहे, अशी खरपूस टीका भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत केली.
भाजपची अवस्था ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरसारखी झाली आहे, अशी टीका आ. जयंत पाटील यांनी केली आहे. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील यांची अवस्थाच कीव करण्यासारखी झाली आहे. नगरपरिषद निवडणुकीत ते ईश्वरपूर, आष्ट्यातून बाहेर पडले नव्हते. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडीलाही ते गेले नाहीत. राज्याचे नेते, पण त्यांना दोन शहरांत जखडून ठेवले होते. त्यांची स्थिती पक्षात, राज्याच्या राजकारणात लिंबू-टिंबूसारखी झाली आहे. त्यामुळेच ते आता आम्हाला ‘पक्षात घ्या की, पक्षात घ्या की’ अशी दिल्लीदरबारी आर्जव करत आहेत. यांचा पक्ष कमी क्षेत्रापुरता, आमदारही कमी. तरीही काही मंत्रिपदासाठी भेटीगाठी सुरू असाव्यात. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी काय विनंती केली, हे माहिती नाही; पण देहबोलीवरून काही आकलन होत असते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. खरे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत आहे, ते पुरेसे आहे, असे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगू. पण दिल्लीच्या नेत्यांनी काही निर्णय घेतला, तर तो मान्य करावा लागेल, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले. पवार यांनी सत्तेशिवाय खूप काळ तग धरला, असा चिमटाही चंद्रकांत पाटील यांनी काढला.
जयंतराव, विशाल, संजय पाटील अस्तित्वासाठी एकत्र : पाटील
चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगलीत भाजपविरोधकांची वाईट अवस्था झाली आहे. जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील यांना अगतिकतेमुळे एकत्र यावे लागले आहे. आपले अस्तित्व टिकवायचा प्रयत्न ते करत आहेत. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत आता पाऊस पडेल, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. त्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, ते पाहायला निवडणूक यंत्रणा, प्रशासन मजबूत आहे. विरोधकांचा पराभव होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे काही तरी कारणे ते आतापासूनच शोधत आहेत.
उध्दव - राज यांच्या अस्तित्वाची लढाई
मुंबई महापालिका निवडणूक ही मराठी माणसांच्या अस्तित्वाची नव्हे, तर उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. राज ठाकरे वीस वर्षे मातोश्रीवर गेले नव्हते, पण आता हतबलता निर्माण झाल्याने मराठीचा मुद्दा उपस्थित करून ते एकत्र आले आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराची तडिपारी; कारवाईला उशीर
महापालिका निवडणुकीत मिरजेत राष्ट्रवादीच्या उमेदवारावर तडिपारीची कारवाई झाल्याकडे लक्ष वेधले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांना भाजपने गुन्हे करायला लावले काय? गुन्हे नसताना कारवाई झाली का? खरे तर कारवाईला प्रशासनाने उशीरच केला आहे.
विश्वजित यांची टीका...ते लोकांना ठरवू देत..!
‘भाजपच्या विकासाच्या घोषणा म्हणजे गाजर का हलवा’, अशी टीका काँग्रेस नेते डॉ. विश्वजित कदम यांनी केल्याकडे लक्ष वेधण्यात आले असता, त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ते लोकांना ठरवू देत. भाजपने केलेला विकास लोकांना दिसला आहे. पूरनियंत्रणासाठी 600 कोटींची निविदा निघाली आहे. कवलापूर विमानतळासाठी सर्वेक्षण झाले आहे. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयामागे तीन हेलिपॅडसाठी कृषी विभागाच्या जागेची परवानगी मिळाली आहे. शेरीनाल्याचा प्रश्न निकाली निघतोय. मार्च महिन्याच्या आत प्रस्तावाला मंजुरी मिळतेय.
सांगली महापालिकेत भाजपचे 55 उमेदवार निवडून येणार
सांगली महानगरपालिकेत भाजपचे 55 उमेदवार निवडून येणार आहेत. महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार आहे आणि भाजपचाच महापौर होणार आहे, असा ठाम विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, भाजपचे नेते शेखर इनामदार, माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे उपस्थित होते.