

सांगली : सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर वचक निर्माण करा, तसेच गुन्हेगारांची दहशत मोडीत काढा, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिले.
सांगलीत पोलिस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, सतीश शिंदे, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांवर वचक निर्माण करून बेसिक पोलिसिंग करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांचा तत्काळ शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याची मंजुरी मिळेल. तोपर्यंत औद्योगिक वसाहतीमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याबाबत तत्काळ आराखडा बनवून जिल्हा नियोजन समितीकडे मान्यतेसाठी पाठवावा.
पाटील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांनी विशेष मॉडेल विकसित करणेगरजेचे आहे. पोलिसांनी ब्लॅक स्पॉट जाहीर केलेल्या ठिकाणी पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेर्यांची व्यवस्था करावी. तसेच गुन्हेगारी कारवायांना अटकाव होण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी.
अमली पदार्थ तस्करांचा बीमोड करा
जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांवर वचक बसण्यासाठी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स नियुक्त केला आहे. या विभागाच्या समन्वयामुळे काही प्रमाणात अमली पदार्थ तस्करीला अटकाव झालेला आहे. परंतु अमली पदार्थ तस्करांवर वचक बसणे गरजेचे आहे. त्यामुळे या तस्करांचा बीमोड करा, अशा सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या.