

सांगली : टेम्पोतून पाठवलेले 5 लाख रुपयांचे वैद्यकीय शस्त्रक्रियेचे साहित्य चोरणाऱ्या महिलांच्या टोळीस पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये कल्पना सुखलाल गोसावी (वय 40), सुनीता अनिल घाडगे (38, रा. गोसावी गल्ली, सम्राट व्यायाम मंडळाजवळ, सांगली) व राणी विलास ऊर्फ पेदान्ना गोसावी ऊर्फ मद्रासी (40, गोसावी गल्ली, माधवनगर) या महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे येथील कल्पक मार्केटिंग प्रा. लि., कंपनीचे विक्री प्रतिनिधी हर्षल हिराचंद देशपांडे हे वैद्यकीय शस्त्रक्रियेचे साहित्य असलेला टेम्पो (एमएच 12 युएम 6362) घेऊन सांगलीत आले होते. 28 नोव्हेंबररोजी रात्री 11 ते दि. 29 रोजी सकाळी 7.30 यादरम्यान टेम्पोतील पाच लाख रुपयांचे साहित्य चोरट्या महिलांनी लंपास केले. याबाबत देशपांडे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील उपनिरीक्षक सागर होळकर व पथक गस्तीवर असताना वैद्यकीय साहित्य चोरणाऱ्या महिला सम्राट व्यायाम मंडळाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला व महिलांच्या टोळीस अटक केली.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
वैद्यकीय साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.