

जत : पंढरपूर-अथणी राष्ट्रीय महामार्गावर शेगाव (ता. जत) हद्दीत कंटेनर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. कामन्ना संगाप्पा हत्तळी (वय 25, मूळ रा. चिकलगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर ) व सचिन गणेश व्हनमाने (वय 21, रा. शेगाव, ता. जत) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात गुरुवार, दि. 4 डिसेंबररोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास शेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर घडला.
याबाबत जत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, कामन्ना हत्तळी व सचिन व्हनमाने हे दोघेही कंटेनर चालक आहेत. कामन्ना हत्तळी याच्या मोठ्या भावाचे शुक्रवारी लग्न असल्याने तो गावी शेगाव येथे आला होता. शेगाव येथील पेट्रोल पंपावर त्याने माल भरलेला कंटेनर उभा केला होता. हा कंटेनर चेन्नईस पोहोच करायचा होता. भावाच्या लग्नासाठी गावी थांबावे लागणार असल्याने त्याने आपला मित्र सचिन व्हनमाने याला हा कंटेनर घेऊन चेन्नईस पाठविण्याचे नियोजन केले. यासाठी तो व्हनमाने याला घेऊन शेगावमधून पेट्रोल पंपावर सोडण्यासाठी निघाला होता.
दरम्यान, जतहून सांगोल्याच्या दिशेने निघालेल्या कंटेनरने पुढील वाहनाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर हत्तळी याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. रात्री उशिरापर्यंत जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.