

सांगली : विवेक दाभोळे
बागायती टापूत उसाच्या तोडी सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी मशीनने उसाची तोड होत आहे. मात्र यातून वाढ्याचा चुराच होतोय. जनावरांसाठी वाढेच उपलब्ध होत नाही. सध्याची दुष्काळी स्थिती आणि चाराटंचाई विचारात घेऊन हंगामाच्या सुरुवातीला किमान तीन महिने मशीनने उसाची तोड करू नये, तरच जनावरांना वाढे मिळेल. तसेच मजुरांकरवी तोड केल्यास त्यांना कामही मिळेल आणि त्यांच्या जनावरांना देखील वाढे मिळेल. शासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तशी मागणी देखील होत आहे.
आता हळूहळू गळीत हंगाम गती घेऊ लागला आहे. शिवारात सर्रास ऊस तोड मशीनची घरघर सुरू झाली आहे. मशीनने ऊस तोडण्यामुळे उसाचे वाढे हाती लागत नाही. यंत्राद्वारे तोडणी केल्यानंतर होणारी उसाच्या वजनातील तूट वेगळीच! याचा विचार करून शासनाने आता तातडीने हंगामाचे पहिले तीन महिने उसाची तोड करण्यास बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच ऊस तोडणी मजुरांकडून जर अडवणूक होत असेल, तर प्रसंगी ऊस उत्पादकाने मालक तोड करून ऊस तोडावा, पण मशीनचा उपयोग करू नये, तरच वाढ्याचा चारा जनावरांसाठी उपलब्ध होणार आहे. आता तर दुष्काळाचे चटके सर्वांनाच बसू लागले आहेत. ऊस बागायतदारांचे तर मोठेच हाल होऊ लागले आहेत.
एकीकडे पाणी टंचाई, उपसाबंदीचे सावट आणि दुसरीकडे उभा ऊस गाळपासाठी लवकर कारखान्याकडे पाठविण्याची होत असलेली अगतिकता ! यामुळे ऊस उत्पादक दुहेरी कचाट्यात सापडला आहे. जोडीला चाराटंचाई आहेच. यामुळे चारा टंचाईवर काही प्रमाणात तरी मात करण्यासाठी मशीनने ऊस तोडीवर हंगामाच्या सुरुवातीला किमान तीन महिने तरी बंदी घालण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने याचा गांभीर्याने विचार करून हंगामात पहिले तीन महिने मशीनने ऊस तोडीला बंदी घालण्याची मागणी होत आहे. खेरीज मशीनने ऊस तोडल्यानंतर एका टनाला पाच टक्के पालापाचोळा गदळ याची वजावट केली जातेच. यामुळे मशीनने तोड शेतकऱ्यांना फारशी फायद्याची ठरतेच असे नाही. याचा देखील विचार होण्याची गरज आहे.
यंत्राद्वारे ऊस तोडीचा फटका...
मजुरांनी केलेल्या उसाच्या तोडीपेक्षा त्याच उसाची तोड यंत्राद्वारे केल्याने एकरी ३८ टक्के उसाची हानी होऊ शकते, असे भारत सरकारच्याच केंद्रीय कृषी यांत्रिकी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्थेनेच स्पष्ट केले आहे. दरम्यान, याखेरीज उसाला तोड येणार किंवा यावी यासाठी शेतकरी किमान महिना ते दीड महिना आधी उसाला पाणी पाजत नाही, यातून एकरी उसाच्या वजनात किमान दहा टक्के घट होते. यातच भर म्हणून की काय, तोडणी मशीनने तोडलेल्या उसात पालापाचोळा, गदळ अशी मिळून साखर कारखाना ५ टक्के तूट धरतो. (ही तूट किती धरायची, हा मुद्दा वादाचा बनलेला आहे.) याखेरीज सर्वात महत्त्वाचे म्हणजे मशीनने तोडलेल्या उसाचे तुकडे तुकडे होतात. यातून उसाचा जास्तीत जास्त पृष्ठभाग हा उघडा पडतो. या उसाच्या तुकड्यांतून किमान तीन टक्के उसाच्या रसाचे उर्ध्वपतन होते. म्हणजे टनाला वजनात तीस किलो घट येते. तसेच विदेशात
तोडणी यंत्राच्या फॅनचा आरपीएम हा १२०० प्रति मिनिट असतो, तर आपल्याकडील तोडणी यंत्रात हा आरपीएम २००० प्रति मिनिट केलेला आहे. या प्रचंड वेगामुळे तोडणी करत असताना लहान, कोवळ्या कांड्या दूरवर फेकल्या जातात. त्या गोळा करतो म्हटले तरी हाताला लागत नाहीत. हे होणारे नुकसान मोठे आहे. केंद्र शासनाच्याच संस्थेने हे स्पष्ट केले आहे. या सर्वाची मिळून होणारी एकूण तूट ही जवळपास ३८ टक्के होते. यातून शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसू लागला आहे.
यामुळेच ज्या शेतकऱ्याला एकरी ५० ते ५५ टन उसाचा उतारा अपेक्षित होता, त्या शेतकऱ्याला तोडणी यंत्राद्वारे उसाची तोड केल्याने ३५ ते ३७ टनावरच समाधान मानावे लागेल. अर्थात हा सारा दोष पावसालाच व बदलत्या वातावरणाला देऊन चालणान नाही, तर यंत्राद्वारे तोड केल्याने देखील शेतकऱ्याला किती फटका बसणार याचा देखील विचार होण्याची गरज आहे. आधीच पाऊस कमी झाल्याने उसाची वाढ झालेली नाही, यातून एकरी उतारा घटणार आहे त्यातून शेतकऱ्यांना नुकसानच सहन करावे लागणार आहे.
परिणामी तोडणी यंत्राद्वारे उसाची तोड केल्याने होणाऱ्या तुटीचा बसणारा फटक हा शेतकऱ्यांचे आर्थिक गणित उद्ध्वस्त करू शकतो, याचा देखील विचार होण्याची गरज आहे. दरम्यान, आता शेतकरी देखील्ल चाऱ्यासाठी उसाचे वाढे मिळाले पाहिजे यासाठी आग्रही होऊ लागला असल्याचे चित्र आहे. शासनाने याची दखल घेण्याची गरज बनली आहे.
तोडणी मशीनने फटकाच
तोडणी यंत्राद्वारे तोड करून उसाचा एकरी उतारा किमान १५ टन घटत असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि याला केंद्र सरकारच्याच एका संस्थेने आपल्या अहवालात दुजोरा दिला आहे. यामुळे आता यंत्राद्वारे उसाची तोड फायद्याची की घाट्याची, हा प्रश्न देखील हंगामाच्या प्रारंभीच ऐरणीवर आला आहे. मजुरांनी केलेल्या उसाच्या तोडीपेक्षा त्याच उसाची तोड यंत्राद्वारे केल्याने एकरी वीस टक्के उसाची हानी होऊ शकते, असे भारत सरकारच्याच केंद्रीय कृषी यांत्रिकी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्थेनेच मध्यंतरी एका निरीक्षणात स्पष्ट केले आहे. तोडणी यंत्राद्वारे केलेल्या तोडीमुळे उसाच्या वजनात विविध प्रकारची मिळून तब्बल ३८ टक्के घट येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आकडा एकरी १५ टनाच्या घरात जातो. आता कारखान्यांनी सरासरी प्रति टन ३५०० रुपयांची पहिली उचल जरी गृहित धरली, तरी १५ टनाचे नुकसान म्हणजे शेतकऱ्याला एकरी निव्वळ ५२ हजार ५०० रुपयांचा नाहक फटका सोसावा लागणार आहे. याचा देखील शेतकऱ्यांनीच विचार करण्याची गरज आहे
जत, वाळवा, मिरजेत सर्वाधिक चाऱ्याची गरज
पशुसंवर्धन विभागाकडील माहितीनुसार तालुकानिहाय आकडेवारी पाहिली, तर जत तालुक्यात सर्वाधिक १ लाख ४२ हजार ९५८ इतके पशुधन आहे. या ठिकाणी दरमहा १ लाख १८ हजार ४१० टन चारा लागतो. सर्वाधिक म्हणण्यापेक्षा मूक जनावरे जगविण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. यासाठी आतापासूनच चाऱ्याचे नियाजन करणे गरजेचे आहे
दुष्काळी भागातील जनावरे बागायती टापूत आणा
यावेळी पावसाने कमालीची मनमानी केली आहे. यामुळे बागायती टापूत आणि पूर्व भागातील दुष्काळी टापूत देखील चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात केवळ तीन महिने पुरेल इतकाच चारा आहे. त्यामुळे तीन महिन्यांनंतर चारा टंचाईवर उपाययोजना शोधत बसण्यापेक्षा आता हातात असलेले उसाचे वाढे नियोजन केल्यास काही महिने नक्कीच पुरू शकते. तसेच तोडणी मजुरांना त्यांचे पशुधन त्याचप्रमाणे चारा टंचाई असलेल्या भागातील जनावरे ऊस पट्ट्यात आणून त्यांना उसाच्या वाढ्यावर जगवता येणे सहजशक्य आहे. मूक पशुधनाला तरच दिलासा मिळू शकतो